पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील आवारात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडला जाईल, अशी शिल्पे उभारण्यात आली आहेत. परंतु, एक वर्षाहून अधिक कालावधीपासून ही शिल्पे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत आज शनिवारी (दि. 3 जानेवारी) सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या शिल्पांचे उद्घाटन व्हावे, अशी अपेक्षा होती. परंतु, या दिवशी सुद्धा उद्घाटन होऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थी संघटनांकडून खेद व्यक्त केला जात आहे.
विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय सर्वांना व्हावा, या दृष्टीने 28 शिल्पे तयार करून ती विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील परिसरात उभी करण्यात आली. या शिल्पांचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे राष्ट्रपती कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, संबंधित शिल्पांचे उद्घाटन होऊ शकले नाही.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परंतु, ही शिल्पे आणखी काही दिवस उद्घाटनाच्या प्रतीक्षेत राहणार आहेत. विद्यापीठाचा वर्धापन दिन येत्या 10 फेबुवारी रोजी आहे. त्यानिमित्ताने या शिल्पांचे उद्घाटन करण्याचा विचार विद्यापीठ प्रशासनाकडून केला जात आहे. सध्या महापालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय नेत्यांच्या हस्ते शिल्पांचे उद्घाटन करणे शक्य नाही. त्यामुळे 3 जानेवारीला या शिल्पांचे उद्घाटन होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एक वर्षाहून अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पांच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्यांची गरज नाही. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्वत: जयंतीनिमित्त या शिल्पाचे उद्घाटन करावे. अन्यथा, विद्यार्थी हे काम हाती घेतील.कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना, महाराष्ट्र राज्य
पाहुणा मिळत नाही म्हणून दोन वर्षांपासून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित शिल्पांचे उद्घाटन केले नाही. आम्ही शुक्रवारी इशारा दिला होता की जयंती दिनी आम्ही आंबेडकरी विद्यार्थी, कार्यकर्ते प्रतिकात्मक उद्घाटन करणार होतो. परंतु, सायंकाळी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक कव्हर काढून स्वच्छता केली आहे. परंतु, मूळ प्रश्न हाच आहे की, प्रत्यक्ष उद्घाटन कधी होणार? शिल्पे सर्वांसाठी खुली कधी होणार?राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती