SPPU Pudhari
पुणे

Pune University Mess Fees Hike: पुणे विद्यापीठातील भोजनगृहांच्या दरात १० रुपयांपर्यंत वाढ; विद्यार्थ्यांमध्ये संताप

१ ऑक्टोबरपासून सुधारित दर लागू; महिन्याला ३०० ते ५०० रुपयांचा अतिरिक्त भार, विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील भोजनगृहांमधील भोजनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. भोजनाच्या दरात १० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना महिन्याला ३०० ते ५०० रुपयेचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे, त्यामुळे विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

ही दरवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी संघटनांनी केली असून, निर्णय मागे न घेतल्यास विद्यापीठ प्रशासन आणि मेसचालकांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सन २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत भोजनाच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.

मात्र, या कालावधीत अन्नधान्य, कडधान्ये, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ, व्यावसायिक एलपीजी गॅस तसेच कामगारांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या दरात विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस आणि पोषक आहार देणे व्यवहार्य राहिले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सविस्तर विचारविनिमय करून सुधारित दर निश्चित केले आहेत. सुधारित दर दि. १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत, असे प्रभारी कुलसचिव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे वातावरण आहे. एका बाजूला विद्यापीठाचे अधिकारी लाखोंचा भ्रष्टाचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला गरीब गरजू विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची दरवाढ करून त्यांचे आर्थिक शोषण करण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करत आहे. आम्ही या दरवाढीचा जाहीर निषेध व्यक्त करतो.
डॉ. राहुल ससाणे, विद्यार्थी
गेल्या ४ महिन्यांपासून अन्न सुधारणा समितीची कोणतीही बैठक झालेली नाही. विद्यार्थ्यांना वेळोवेळी येणाऱ्या समस्या ऐकून घेणे अथवा याबाबत चर्चा करण्याऐवजी त्याउलट विद्यार्थ्यांवर अवैध पद्धतीने शुल्क वाढवणे हे निषेधार्ह आहे.
राधेय बाहेगव्हाणकर, अभाविप, पुणे महानगरमंत्री
मेस दरवाढीचे कारण म्हणून महागाई योग्य असू शकते, पण त्याची किंमत विद्यार्थ्यांनी मोजू नये. वाढीव १० रुपयांचा भार विद्यार्थ्यांवर न टाकता विद्यापीठाने अनुदानाच्या माध्यमातून उचलावा. विद्यार्थ्यांना न विचारता घेतलेले निर्णय योग्य नाहीत. भोजनाच्या गुणवत्ता, प्रमाण आणि दरवाढीबाबत विद्यापीठाने स्पष्टता द्यावी व विद्यार्थी प्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेत सहभागी करावे.
अभिषेक शेलकर, सदस्य, भोजनगृह व गुणवत्ता नियंत्रण समिती
दरवाढीमुळे भोजनाच्या गुणवत्ता आणि प्रमाणात नेमके काय बदल होणार आहेत, याबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आजही अनेक विद्यार्थ्यांना महाडीबीटी व इतर शिष्यवृत्ती योजनांची रक्कम वर्षभर उलटूनही मिळालेली नाही. अशा परिस्थितीत भोजन दरवाढ ही आमच्यासारख्या ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थिनींसाठी अतिरिक्त आर्थिक भार ठरणारी आहे.
प्रतीक्षा वाघमारे, विद्यार्थिनी
मेसमधील जेवण हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. मात्र, थाळीच्या दरवाढीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही दरवाढ परवडणारी नाही.
श्रीकांत कांबळे, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT