Purandar Custard Apple: पुरंदरच्या सीताफळाला देशभरात मागणी; पावसाच्या ओढीने उत्पादन घटले

बाजारभाव उच्चांकी पातळीवर
Purandar Custard Apple
Purandar Custard ApplePudhari
Published on
Updated on

दिवे: पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या सीताफळाचा हंगाम सध्या जोमात सुरू आहे. विविध जातींच्या सीताफळांमध्ये पुरंदरवासीयांनी पिढ्यान्‌पिढ्या जपलेली 'फुले पुरंदर' जात भरपूर गर, उत्कृष्ट चव आणि दर्जामुळे बाजारात सरस ठरत आहे.

पुरंदरचे सीताफळ देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पोहोचत असून दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, जयपूर, गोवा, हैदराबाद आणि बंगळुरू आदी ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात सीताफळ पाठविले जात आहे.

Purandar Custard Apple
Baramati Rain: दीड महिन्यापासून पावसाची दडी! बारामतीत उन्हाचा तडाखा वाढला; शेतकरी चिंतेत, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

डोंगरउतार, माळरान तसेच हलक्या आणि उत्तम निचऱ्याच्या जमिनीत सीताफळाचे चांगले उत्पादन मिळते. पुरंदर तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रावर सीताफळाची लागवड असून, दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढत आहे. कमी पाण्यात येणारे पीक, तुलनेने कमी उत्पादन खर्च आणि मोठ्या प्रमाणातील लागवड यामुळे सीताफळाला स्थानिक पातळीवरही मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

सासवडसह परिसरातील बाजारपेठांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच परराज्यातील व्यापारीही सीताफळ खरेदीसाठी दाखल होत आहेत. वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने अनेक शेतकरी सासवड, गुऱ्होळी आदी स्थानिक बाजारपेठांमध्येच सीताफळ विक्रीसाठी आणत आहेत. स्थानिक बाजारात रोख स्वरूपात व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार करणे सोयीचे ठरत आहे.

यंदा मे आणि जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने सीताफळ बागांमध्ये फळधारणा काही प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी बाजारातील आवक घटली असून मागणी वाढल्याने बाजारभाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सध्या उत्तम प्रतीच्या सीताफळाच्या एका कॅरेटला तब्बल ३ हजार रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळत आहे. परराज्यातही पुरंदरच्या सीताफळाला मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Purandar Custard Apple
Gauri Festival Market Pune: गौराईच्या आगमनाने फुले, फळे अन् भाज्यांना 'भाव'

सासवड बाजारपेठेतून सीताफळ खरेदी करून विविध राज्यांमध्ये पाठविणाऱ्या तुषार झेंडे, प्रणव काळे, नितीन काळे, गौरव काळे, शंकर झेंडे, विशाल तळेकर, सुशील झेंडे, विठ्ठल काळे, गिरीश काळे, सागर धुमाळ, गणेश काळे, किशोर काळे आणि योगेश भिंताडे या व्यापाऱ्यांनी यंदा परराज्यातून मागणी वाढल्याचे सांगितले.

स्थानिकांना रोजगाराची संधी

पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर सीताफळाचे उत्पादन होत असल्याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांकडून सीताफळ खरेदी करून परराज्यात पाठविण्याचा व्यवसाय करीत आहेत. काही तरुण सीताफळाच्या गरापासून प्रक्रिया केलेले उत्पादन (पल्प) तयार करीत असून, या प्रक्रियेमुळे परिसरातील शेकडो महिलांनाही रोजगार मिळत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news