पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्के शिक्षक असल्याची माहिती बीओडी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वेळोवेळी मुदत दिली होती.
पंरतु अनेक महाविद्यालयांनी संबंधित माहिती भरलेली नाही. त्यामुळे अखेर विद्यापीठाने येत्या 18 मे पर्यंत अंतीम मुदतवाढ दिली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये शिक्षकांची माहिती अपलोड करून न देणाऱ्या महाविद्यालयांची 2026-27 या शैक्षणिक वर्षाचे प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवले जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग तसेच शासनाने निर्धारित केलेल्या किमान मानंकानुसार ज्या संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थामध्ये 31 मार्च 2026 पर्यत नियमित आणि तदर्थ स्वरूपात नियुक्त झालेल्या आणि विद्यापीठाची मान्यता असलेल्या शिक्षकांची किमान संख्या एकत्रितपणे 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल अशा संलग्नित महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी प्रवेश शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये थांबविण्यात यावेत, असा निर्णय विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने 24 जानेवारी 2026 घेतला आहे.
शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता दिनांक 15 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही 9 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, असे निदर्शनास आले आहे की अद्याप बऱ्याच महाविद्यालयांची, मान्यताप्राप्त परिसंस्थांची माहिती बीओडी पोर्टलवर ऑनलाईन स्वरूपात अपलोड करणे बाकी आहे.
त्यामुळे संबंधित महाविद्यालयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना 18 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही अंतिम मुदतवाढ असून, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण न केल्यास महाविद्यालयांना काहीही म्हणायचे नाही, असे समजून महाविद्यालयातील, परिसंस्थेमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेदेखील विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.