Pune Savitribai Phule University Raj Bhavan to Ganeshkhind Flyover
पुणे : पुणे विद्यापीठाजवळील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन ते आरबीआय गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन बुधवारी 20 ऑगस्टरोजी होणार आहे. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुलाच्या लोकार्पणाचा हा सोहळा पार पडणार आहे.
मेट्रोचे काम, रस्त्यावरील खड्डे आणि वाहनांची वाढती संख्या अशा परिस्थितीत अडकलेल्या पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी ही रोजचीच तक्रार. कोरोना काळात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल मेट्रोच्या कामासाठी पाडण्यात आले होते. गेली साडे चार वर्ष विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी डोकेदुखीच ठरली होती. मेट्रो कामांमुळे रस्त्याची दुरावस्था, वाहनांच्या रांगा आणि त्यात खड्ड्यांमुळे कोंडीत पडणारी भर यामुळे पुणेकर चांगलेच वैतागले होते.
अखेर नागरिकांची या विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होणार आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील X या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन ते आरबीआय गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे बुधवारी लोकार्पण केले जाईल', अशी माहिती आ. शिरोळे यांनी दिली.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (SPPU) दुमजली उड्डाणपुलाचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या 88 ते 90 टक्के काम पूर्ण झाले असून शिवाजीनगर आणि औंध बाजूचे रॅम्प जवळपास तयार झाले आहेत. बाणेर आणि पाषाण बाजूचे रॅम्प ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील. उड्डाणपुलाची रंगरंगोटी आणि दिशादर्शक फलक लावण्याचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे या वर्षाखेरपर्यंत विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्याची चिन्हे आहेत.