

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने 'सायकल बँक' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत दीड हजार सायकली प्रशासनाला भेट म्हणून मिळाल्या आहेत. पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम सुरू केला.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या सायकली विविध गावांमध्ये विद्यार्थिनींना देण्यात आल्या. आठवीनंतर ही सायकल पुन्हा 'सायकल बँके'त जमा करावी लागणार आहे. 'सायकल बँक' या अभिनव उपक्रमाला जिल्ह्यातील दानशूर नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत एक हजार ४३० सायकली विविध नागरिकांकडून जमा झाल्या आहेत. जिल्हा परिषदेने सायकल बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थिनींना यातून शिक्षणासाठी सायकल वापरण्यास मोफत दिल्या जाणार आहेत. जोपर्यंत विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळेत शिकत असतील तोपर्यंत त्यांच्या घरी ही सायकल राहील आणि त्या शाळेत ये-जा करण्यासाठी ती वापरतील. मात्र, आठवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सायकल पुन्हा संबंधित शाळेच्या सायकल बँकेत जमा करावी लागेल. त्यानंतर ही सायकल इतर विद्यार्थिनींसाठी देण्यात येईल, जेणेकरून सायकलीचा लाभ अनेक विद्यार्थिनींना मिळण्यास मदत होईल.
यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींची संख्या ३२ ते ३५ हजार
या सायकली प्रामुख्याने सीएसआर निधीतून तसेच आवश्यकता भासल्यास जिल्हा निधीतून खरेदी केल्या जाणार
या सायकलींचा लाभ गरजू विद्यार्थिनींना मिळणार
शिक्षणाच्या प्रवासाला नवी गती मिळणार
तालुका - सायकली
शिरूर - ३३१
खेड - २५०
मुळशी - १२५
जुन्नर - ११२
मावळ - ११२
बारामती - ११०
पुरंदर - १०८
इंदापूर - १०१
आंबेगाव - ६०
दौंड - ५१
भोर - १५
हवेली - ३०
राजगड (वेल्हे) - २५