SPPU Pudhari
पुणे

Pune University Vacant Posts: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा मोठा अनुशेष; ६३१ पदे रिक्त

साडेसात लाख विद्यार्थ्यांचा कारभार अवघ्या ६०७ कर्मचाऱ्यांवर; महत्त्वाच्या प्रशासकीय पदांचाही भार रिक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. विद्यापीठातील १ हजार २३८ मंजूर पदांपैकी केवळ ६०७ पदांवर कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ६३१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाचा भार उपलब्ध कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विशेष म्हणजे, सध्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विविध अभ्यासक्रमांमधील विद्यार्थिसंख्या साडेसात लाखांवर गेली असून, त्यांचा कारभार मात्र अर्ध्याच मनुष्यबळावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाची आकृतिबंध रचना २००९ मध्ये ४ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन केली होती. त्यानंतर विद्यार्थिसंख्येत मोठी वाढ झाली. परंतु त्याच प्रमाणात शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे भरली गेली नाहीत. परिणामी, प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठातील महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरही मोठ्या प्रमाणात रिक्तता आहे.

१९ उपकुलसचिवांच्या मंजूर पदांपैकी केवळ चार अधिकारी कार्यरत आहेत. २९ सहायक कुलसचिवांच्या पदांपैकी केवळ तीन अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी एक अधिकारी नोव्हेंबरअखेर निवृत्त होणार आहे. सहायक वित्त अधिकाऱ्यांच्या चार पदांपैकी एकच पद भरलेले आहे. उपवित्त अधिकारी आणि सहायक लेखा अधिकारी ही पदेही रिक्त आहेत.याशिवाय, उपकुलसचिव (कायदा व तक्रार निवारण), जनसंपर्क अधिकारी, प्रेस मॅनेजर आणि सुरक्षा अधिकारी ही पदे रिक्त आहेत.

दोन उपअभियंत्यांची पदेही भरलेली नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन पदांपैकी एक पद रिक्त आहे. काही विभागांमध्ये उपलब्ध अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवून कामकाज सुरू ठेवले जात आहे. सहायक कुलसचिवांना उपकुलसचिव पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. कुलसचिवपद भरण्याची परवानगी मिळविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. याचा थेट परिणाम विद्यापीठाच्या प्रशासकीय दर्जावर होत असून, विविध रँकिंगला याचा मोठा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठातील विभागांची पुनर्रचना करून उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. या माध्यमातून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी भरतीबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.
डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT