PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? भाजपसमोर उमेदवारीची कसोटी

शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई प्रभागात इच्छुकांची गर्दी, चुरशीची लढत अटळ

पुढारी वृत्तसेवा

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई या प्रभागात भाजपसमोर निवडणुकीपेक्षा उमेदवारी कोणाला द्यायची हीच खरी कसोटी असणार आहे. उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. एकीकडे या प्रभागातून माजी नगसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले असता, दुसरीकडे तरूण कार्यकर्त्यांनी देखील कंबर कसल्याने आगामी निवडणूक रंगतदार होणार आहे. तर भाजपला हरविण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांचा प्रभाग असलेल्या शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई या प्रभाग क्र. 25 मध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ या भागांसह शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, नूतन मराठी विद्यालय, राजा दिनकर केळकर संग््राहालय, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌‍या महत्त्वाच्या परिसरांचा या प्रभागात समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या 76 हजार 262 इतकी आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्ग 1158, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांची संख्या 502 इतकी आहे यामुळे आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या माजी नगरसेवकांसह जुने, नवे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या प्रभागातून भाजपकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हेमंत रासने, माजी महापौर दिवंगत मुक्ता टिळक, राजेश येनपुरे आणि ॲड. गायत्री खडके हे निवडून आले होते. काही वर्षांपूर्वी मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. तसेच हेमंत रासनेे आमदार झाले आहे. यामुळे माजी नगरसेवकांपैकी भाजपकडून राजेश येनपुरे आणि ॲड. गायत्री खडके हे पुन्हा इच्छुक आहेत. टिळक यांच्या जागी त्यांचे चिरंजीव कुणाल टिळक, तर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट हे इच्छुक आहेत. याशिवाय शहर सरचिटणीस राघवेंद्र (बापू) मानकर यांनी जोरदार तयारी केली आहे. याशिवाय अन्यही बारा ते पंधरा जण इच्छुक आहेत.

मात्र, या प्रभागात सर्वसाधारण खुल्या गटात एकच जागा असल्याने इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यात कोण बाजी मांडणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे, तर ओबीसी वर्गासाठी दोन जागा असून त्यात ॲड. खडके यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते नितीन पंडित अथवा त्यांच्या पत्नी स्वप्नाली पंडित यांचेही नाव चर्चेत आहे. याशिवाय प्रभागात काही माजी नगसेवक आणि जुने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना जुन्या कि नवीन चेहऱ्यांबरोबर घराणेशाही संधी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांकडून सध्या विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, जनसंपर्कावर भर दिला जात आहे.

हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला म्हणून अशी ओळख असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास, काँग््रेास, दोन्ही शिवसेना, मनसे अशा सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, ही मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे मनसेसह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधल्यास भाजपला ताकद लावावी लागू शकते अशा पध्दतीचे निवडणूक चुरशीची होऊ शकते. मात्र, विरोधकांमध्ये जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

प्रभागातील आरक्षण

  • ‌‘अ‌’ गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

  • ‌‘ब‌’ गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग

  • ‌‘क‌’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)

  • ‌‘ड‌’ गट : सर्वधारण प्रवर्ग

विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार

भाजप : राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, दिलीप काळोखे, नितीन पंडित, स्वप्नाली पंडित, उदय लेले, ॲड. गायत्री खडके, कुणाल टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र (बापू) मानकर, सतीश मोहोळ, नीलेश कदम, रूपाली कदम, मनीष जाधव, बापू नाईक, रोहिणी नाईक, थोरविणा येनपुरे.

राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) : दिलीप पोकळे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अप्पा जाधव, केतन कदम, प्रशांत गांधी, संतोष जोशी.

राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) : सुनील खाटपे, रूपाली ठोंबरे-पाटील, राजेंद्र जोशी.

शिवसेना (ठाकरे गट) : निरंजन दाभेकर, नंदकुमार येवले, परेश खांडके, मयूर भुंडे.

काँग््रेास : सुरेश कांबळे, गोरख पळसकर, गणेश शेडगे, गौरव बोराडे, मंगेश थोरवे, ऋषिकेश वीरकर.

मनसे : गणेश भोकरे, अमृता भोकरे, आशीष माने, नीलेश हांडे, सारंग सराफ.

शिवसेना (शिंदे गट) : रणजित ढगे, प्रकाश ढमढेरे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT