पुणे : राज्यातील दुर्गम भागातील खेडोपाडी, वाडी-वस्त्यांवरील किरकोळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणींची सोडवणूकीकडे कृषी विभाग सोयिस्कररित्या दुर्लक्ष करुन विक्रेत्यांवर अनपेक्षित व अनावश्यक कारवाई करत आहेत. ज्यामध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी विभागाकडून नोटिस देऊन त्यांचे परवाने निलंबन करणे, परवाना रद्द करण्यासारख्या कारवाईचा समावेश आहे.(Latest Pune News)
त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रीसाठीच्या साथी पोर्टल दोनच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस्, सीडस डिलर्स असोसिएशनच्यावतीने (माफदा) येत्या मंगळवारी (दि.28) एक दिवसांचा राज्यव्यापी लाक्षणिक बंदचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे पुरवण्याबरोबरच बियाणे उत्पादक कंपन्यांकडून दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्यांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. अशा बियाणे उत्पादन आणि विक्रीचे निरीक्षण करण्यासाठी बियाणे कंपन्या, घाऊक विक्रेत्यांसाठी साथी पोर्टल एक आणि निविष्ठांच्या किरकोळ विक्रेत्यांसाठी साथी पोर्टल दोनची अंमलबजावणी सुरु केली आहे. ज्यामध्ये ऑनलाईनद्वारेच सर्व कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार राज्यातील कंपन्या व घाऊक विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत काम सुरु केले. मात्र, साथी पोर्टल दोनच्या टप्प्यात ऑनलाईन निविष्ठा विक्रीस खेडेगांवातील किरकोळ निविष्ठा विक्रेत्यांना असंख्य अडचणी येत असल्याची बाब माफदा संघटनेच्या शिष्टमंडळाने समक्ष आणि लेखी निवेदनाद्वारे कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे २८ ऑक्टोबर रोजी एक दिवस बंद राहतील. राज्यात 85 हजार कृषी निविष्ठा दुकानदार या बंदमध्ये सहभागी होत आहेत. तसे निवेदन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या साथी पोर्टल विभागाच्या सहाय्यक संचालक व समन्वयक पारुल जैन आणि राज्याच्या कृषी विभागास माफदाच्यावतीने देण्यात येऊन प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दुर्गम आणि दुर्गम भागातील कृषी केंद्र चालकांकडे संगणक, प्रिंटर आणि स्कॅनरची कमतरता आहे आणि विक्री केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अपुरी संख्याही राहते. खरीप आणि रब्बी हंगामात कृषी निविष्ठा विकण्यासाठी अत्यंत कमी म्हणजे 15 ते 20 दिवसांचा कालावधी राहतो. शेतकरी या काळात एकाच वेळी विक्री केंद्रांवरून गर्दी करुन विविध प्रकारचे बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके खरेदी करतात. त्यामुळे साथी पोर्टल दोनद्वारे बियाणे विक्री करणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील विक्रेत्यांसाठी ही एक रोजची समस्या बनली असल्याचे ते म्हणाले.