अमृत भांडवलकर
सासवड: सासवड शहरात पाणीटंचाईच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाढती लोकसंख्या, विस्तारणारी हद्द आणि वाढलेल्या गरजांच्या तुलनेत सध्याची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे अपुरी पडत आहे. त्यामुळे सासवडकरांची तहान आजही कायम असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहराला सध्या पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सुमारे २७ वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. त्या वेळी असलेली लोकसंख्या आणि आजची परिस्थिती यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असताना जुन्याच योजनेवर संपूर्ण शहराचा भार पडत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
नगर परिषदेकडून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पाच ते सहा दिवसांनी पाणी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पाणीसाठवणुकीसाठी अतिरिक्त कसरत करावी लागत आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकर, विहिरी आणि इतर पर्यायी स्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे.
उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते. वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने अनेक भागांत पाणीटंचाईचे चटके बसतात. त्यातच जुन्या जलवाहिन्यांमधील गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एका बाजूला अपुरा पुरवठा आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचा अपव्यय यामुळे प्रशासनाविरोधातील नाराजी वाढत आहे.
गेल्या दोन दशकांत शहरात अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असताना त्यानुसार पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. भविष्यातील गरजांचा विचार करून स्वतंत्र व दीर्घकालीन पाणीपुरवठा योजना राबविण्याची आवश्यकता नागरिकांकडून वारंवार व्यक्त केली जात आहे.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा केवळ गैरसोयीचा विषय नसून आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे सासवडसारख्या वाढत्या शहरासाठी सक्षम आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. अन्यथा शहराच्या विकासाबरोबर पाणीटंचाईचाही प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा सवाल
२७ वर्षांपूर्वीच्या योजनेवर शहर किती दिवस चालणार?
पाण्यासाठी पाच-सहा दिवस प्रतीक्षा का?
गळती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार?
सासवडसाठी स्वतंत्र व दीर्घकालीन योजना कधी होणार?