

पुणे: इन्स्टाग्रामवर झळकणाऱ्या रील्स, यूट्यूबवरील लोकसंगीताचे व्हिडीओ, युवा महोत्सवांमध्ये लोककलांचे सादरीकरण... अशा विविध नव्या प्रयोगांमुळे महाराष्ट्राच्या लोकसंगीताला नवी ऊर्जा मिळत आहे. ग्रामीण भागातील यात्रा-जत्रा, धार्मिक उत्सव अन् लोकपरंपरेपुरते मर्यादित असलेले लोकसंगीत आता नव्या पिढीच्या हृदयात स्थान मिळवत आहे. आधुनिक पाश्चात्त्य संगीत, रॅप आणि डीजे संस्कृतीच्या प्रभावातही लोकसंगीताचे पारंपरिक सूर तरुणाईला आकर्षित करीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसंगीत नव्या रूपात समोर येत असून, मराठी लोकसंस्कृती-परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहचत आहे.
रविवारी (दि. 21) साजऱ्या होणाऱ्या जागतिक संगीत दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने घेतलेल्या आढाव्यात लोकसंगीताच्या क्षेत्रात नव्या उत्साहाचे चित्र दिसून आले. 'फोक आख्यान', 'फोक लोक', 'फोक प्रबोधन' यांसारख्या विविध कार्यक्रमांमधून तरुण कलाकार महाराष्ट्राच्या लोककला, लोकपरंपरा आणि लोकसंगीताची ओळख नव्या पिढीला करून देत आहेत. संबळ, हलगी, पखवाज, टाळ, ढोल अशा विविध लोकवाद्यांच्या वादनातून निर्माण होणारे पारंपरिक लोकसंगीत तरुणाईला आवडू लागले आहे. लोकवाद्यांमधील ऊर्जा आणि थेट मातीशी जोडलेला भावनिक स्पर्श, यामुळे लोकसंगीताबद्दलची उत्सुकता वाढताना दिसत आहे. रील्स आणि व्हिडीओंच्या माध्यमातून लोकसंगीताचा प्रसार वाढला आहे.
महाविद्यालयीन युवा महोत्सव, सांस्कृतिक स्पर्धा आणि विविध कला महोत्सवांमध्येही लोकसंगीताला वाढते स्थान मिळत आहे. अभंग, कीर्तन, भारूड, शाहिरी, जागरण-गोंधळसारख्या कलांमधील संगीत तरुणाईला भावत असून, अनेक तरुण कलाकार लोकसंगीताला आधुनिक सादरीकरणाची जोड देत नवे प्रयोगही करीत आहेत. ग्रामीण भागातील कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसंगीत लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लोककला आणि संगीतावरील कार्यक्रमांची संख्या वाढली असून, या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकसंगीतावर आधारित पॉडकास्ट, यूट्यूब चॅनेल आणि अल्बमचीही निर्मिती होत आहे.
याविषयी 'फोक प्रबोधन' कार्यक्रमाचे सादरकर्ते शेखर नवतरे म्हणाले, महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा, लोककलांचा आणि लोकसंगीताचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. प्रत्येक लोककलेमागे एक लोकवाद्य आणि स्वतंत्र लोकसंगीत परंपरा आहे. आमच्या कार्यक्रमात लोकसंगीताला विशेष महत्त्व असते. सुमारे ४० कलाकारांच्या सहभागातून अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, भारूड, गोंधळ आदींचे सादरीकरण केले जाते. हलगीपासून ते संबळपर्यंत विविध लोकवाद्यांचे वादनही कलाकार करतात. या सादरीकरणांना तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. गेल्या काही वर्षांत लोकसंगीताबद्दल तरुणाईचे आकर्षण वाढले असून, हा कल लोकसंस्कृती-परंपरेच्या, संगीताच्या जतनासाठी आशादायी आहे.''
लोकसंगीताचा तरुणाईवर वाढता प्रभाव
इन्स्टाग्राम रील्समधून लोकगीते, संगीताची लोकप्रियता
लोकसंस्कृती आणि इतिहासाशी जोडले जाण्याची संधी
महाविद्यालयीन कार्यक्रमांत लोककलांना, लोकसंगीताला प्राधान्य
नव्या प्रयोगांतून लोकसंगीताला आधुनिक स्पर्श
लोककलाकारांना मिळतेय जागतिक व्यासपीठ
लोककलांवरील कार्यक्रमांना मिळतेय आर्थिक बळ
पूर्वी लोककला, लोकसंगीतांच्या कार्यक्रमांसाठी लोककलावंतांना फारसे मानधन मिळत नव्हते. पण, आज सोशल मीडियामुळे अनेक लोककलावंतांना कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणांहून निमंत्रणे येत आहेत. युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवरून मिळणारे मानधन, प्रायोजकत्व आणि डिजिटल उत्पन्नही कलाकारांसाठी आर्थिक स्रोत ठरत आहे. अनेक लोककलावंतांनी स्वतःचे युट्यूब चॅनेल, ऑनलाइन कार्यशाळा आणि लोकवाद्य प्रशिक्षणवर्ग सुरू केले. लोकसंगीतावर आधारित कार्यक्रमांचीही चांगली कमाई होत असून, लोककलावंतांना चांगले मानधनही मिळत आहे.