BJP ShivSena Pudhari
पुणे

Saswad Veer Group Election Result: वीर गटात भाजपचा धडाकेबाज विजय; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भगवा

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अंतर्गत कलहाचा फटका; मतविभागणीमुळे समीकरणे बदलली

पुढारी वृत्तसेवा

अमृत भांडवलकर

सासवड: पुरंदर तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वीर गटात यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. स्थानिक पातळीवरील गटबाजी, उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी, पक्षांतर आणि अंतर्गत मतभेद यांचा थेट परिणाम निकालात उमटला असून, भाजपने दमदार कामगिरी करत आपले वर्चस्व ठळकपणे सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग््रेास आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्षामुळे निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एका जागेवर चुरशीच्या लढतीत विजय मिळवला, तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले.

उमेदवारी नाकारल्याने राजकीय भूकंप

वीर गटातील राजकारणाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व इच्छुक उमेदवार हरिभाऊ लोळे यांची उमेदवारी नाकारल्यानंतर. नाराज झालेल्या लोळे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत अधिकृत उमेदवारी मिळवली. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि पारंपरिक समीकरणे ढवळून निघाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग््रेासचे ज्येष्ठ नेते हेमंतकुमार माहूरकर यांनी अर्ज माघारी घेण्यास नकार देत निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे राष्ट्रवादीत देखील अंतर्गत असंतोष उफाळून आला. परिणामी मतांची विभागणी होऊन भाजपला संधी मिळाली.

आमदार विजय शिवतारेंच्या बालेकिल्ल्यात धक्का

आमदार विजय शिवतारे यांची जन्मभूमी आणि प्रभावक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर गटातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. भाजप आणि राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावल्याने वातावरण तापले होते. वीर जिल्हा परिषद गटात भाजपचे हरिभाऊ लोळे यांनी 11 हजार 591 मते मिळवत विजय मिळवला, तर शिवसेनेचे समीर जाधव यांना 11 हजार 41 मते मिळाली. अवघ्या 550 मतांच्या फरकाने लोळे यांनी विजय मिळवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवले.

पंचायत समिती स्तरावर मात्र चित्र काहीसे वेगळे होते. वीर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांनी 5 हजार 921 मते मिळवत 159 मतांच्या फरकाने विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी सुधीर शिवाजीराव धुमाळ यांना 5 हजार 762 मते मिळाली. भिवडी पंचायत समिती गणात भाजपच्या सायली मनोज शिंदे यांनी 6 हजार 766 मते मिळवत 854 मतांच्या आघाडीने विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी पूजा सागर मोकाशी यांना 5 हजार 912 मते मिळाली.

बहुरंगी लढत; प्रतिष्ठेचा सवाल

वीर गटात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग््रेास आणि काँग््रेास या सर्व प्रमुख पक्षांचे दिग्गज चेहरे मैदानात उतरले होते. त्यामुळे ही लढत केवळ मतांची नव्हे, तर प्रतिष्ठा आणि वर्चस्वाची बनली होती. शिवसेनेचे उमेश गायकवाड, पिनूशेठ काकडे, सागर करवंदे, अमोल धुमाळ, सदानंद बोरकर, सुशील चव्हाण; भाजपचे शैलेश तांदळे, विठ्ठल मोकाशी, संतोष धुमाळ, भूषण ताकवले, गणेश जगताप, चंद्रकांत बोरकर; तसेच राष्ट्रवादीचे शरद जगताप, राजेंद्र धुमाळ, राहुल गायकवाड, अमोल पोमण आदी नेत्यांचे मजबूत संघटन या गटात कार्यरत होते; मात्र, स्थानिक पातळीवरील असंतोष आणि मतांची झालेली विभागणी यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद बसला. वीर गटातील हा निकाल आगामी राजकारणासाठी दिशादर्शक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT