Waste Dumping Issue Pudhari
पुणे

Saswad Waste Dumping Issue: सासवड वाघ डोंगर कचऱ्याच्या विळख्यात; निसर्गसौंदर्य धोक्यात

पर्यटकांच्या आवडीचा परिसर घाणीमुळे अस्वच्छ; प्रशासनाकडून कारवाईची मागणी तीव्र

पुढारी वृत्तसेवा

सासवड: निसर्गरम्य वातावरण, हिरवाईने नटलेला परिसर आणि फिरण्यासाठी नागरिकांची पसंती असलेली सासवड येथील वाघ डोंगर सध्या घाणीच्या विळख्यात सापडला आहे. काही बेजबाबदार नागरिकांकडून आणि व्यावसायिकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे या परिसरातील निसर्गसौंदर्य धोक्यात आले आहे. पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वन विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वाघ डोंगर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची आणि वनस्पतींची वाढ झाली आहे. त्यामुळे हा भाग अनेक पक्षी आणि वन्यजीवांचे आश्रयस्थान बनला आहे. पर्यटन व इको-टुरिझम केंद्र म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. मात्र, या नैसर्गिक संपदेवर आता घाणीचे सावट पससले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून वाघ डोंगराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. कापलेल्या कोंबड्यांचे अवशेष, हॉटेलमधील शिल्लक अन्न तसेच इतर जैविक कचरा उघड्यावर फेकण्यात येत असल्याने परिसर अस्वच्छ बनला आहे.

याशिवाय खराब फर्निचर, तुटलेल्या घरगुती वस्तू, जुन्या गाद्या-उशा, थर्माकॉल, प्लास्टिक साहित्य, बाटल्या, पत्रावळ्या आणि बांधकामातील राडारोडा या परिसरात टाकला जात आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या डोंगराच्या पायथ्याशी आणि घाट रस्त्यालगत निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.

व्यायामासाठी येणारे तसेच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांना दुर्गंधीयुक्त वातावरणाचा सामना करावा लागत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, विशेष पथके आणि नियमित गस्तीद्वारे कचरा टाकणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. वाघ डोंगराचे नैसर्गिक वैभव जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

नगरपरिषदेचा इशारा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे, असे सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT