सासवड: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवडमधून रविवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या कामाला आता वेग आला आहे, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख विश्वस्त ॲड. त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी दिली.
रविवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री संत सोपानदेव मंदिराच्या देऊळवाड्यातून पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर दुपारचा विसावा पिंपळे तर, पांगारेतील निष्णाईदेवी मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल. सोमवार दि. १३ जुलै रोजी पिलाणवाडी, कांबळवाडी, यादववाडी येथे सकाळचा विसावा होऊन परिंचेत दुपारचा नैवेद्य तर, मांडकीत रात्रीचा मुक्काम होईल. मंगळवार दि. १४ जुलैला सकाळचा विसावा जेऊर, पिंपरे खुर्दमधून निरेत दुपारचा नैवेद्य तर बारामतीतील निंबूत, विठ्ठल मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल.
बुधवार दि. १५ जुलै रोजी निंबूत छपरी, वाघळवाडीमध्ये पहिले गोल रिंगण होऊन सोमेश्वरनगरमध्ये मुक्काम होईल. गुरुवार दि. १६ जुलैला करंजेपूल, सोरटेवाडी येथे सकाळचा विसावा तर १० फाटामध्ये दुपारचा नैवेद्य, वडगाव निंबाळकरमध्ये दुपारचा विसावा होऊन कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये मुक्काम होईल.
शुक्रवार दि. १७ जुलैला कठीणपूलमध्ये सकाळचा विसावा तर पणदरेत दुपारचा नैवेद्य, दुपारचा माळेगाव बुद्रुक कोकाटे महाराज वस्तीत विसावा होऊन बारामती, शारदा प्रांगणात मुक्काम होईल. शनिवार दि. १८ जुलै रोजी सकाळचा मोतीबाग विसावा होऊन पिंपळी येथे बकरी रिंगण होऊन भवानीनगर, सणसर, बेलवाडी फाटा येथे दुपारचा विसावा आणि त्यानंतर लासुर्णे येथे मुक्काम होईल.
रविवार दि. १९ जुलैला लालपुरीमध्ये सकाळचा विसावा, तर निमसाखर येथे दुपारचा विसावा होऊन निरवांगी, पालखीतळ येथे मुक्काम होईल. सोमवार दि. २० जुलै रोजी तरंगेवस्ती, रेडणीत सकाळचा विसावा, लाखेवाडीत दुपारचा नैवेद्य, तर खाराओढा, निरनिमगाव चौक, बोरावके पेट्रोलपंप येथे दुपारचा विसावा होऊन अकलूज राम मंदिरात हा सोहळा मुक्कामी पोहचेल. मंगळवार दि. २१ जुलैला बाबीर पूल, महाळुंग सकाळचा विसावा, दुपारचा नैवेद्य श्रीपुरात तर माळखांबी दुपारचा विसावा होऊन बोंडलेच्या विठ्ठल मंदिरात मुक्काम होईल.
बुधवार दि. २२ जुलैला बोंडलेमध्ये सकाळचा विसावा, बोंडलेत श्री संत सोपानदेव महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल आणि भंडीशेगाव, पालखीतळमध्ये मुक्काम होईल. गुरुवार दि. २३ जुलै रोजी भंडीशेगाव येथे दुपारचा नैवेद्य, वाखरीत उभे रिंगण आणि पालख्यांच्या भेटीचा सोहळा तसेच वाखरीत पालखीचा मुक्काम होईल. शुक्रवार दि. २४ जुलैला पालख्यांचे वाखरी पादुकाजवळ उभे रिंगण व आरती होऊन श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये आगमन होईल, असे पालखी सोहळाप्रमुख विश्वस्त ॲड. त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी सांगितले.