सासवड: सासवड-सोनोरी (ता. पुरंदर) रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कामासाठी २० लाख रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे कायम आहेत. या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी पुरंदर तालुका आरपीआयचे अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सासवड-सोनोरी हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या मार्गावर एसटी बससह शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा बनला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सुमारे २० लाख रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. मात्र, एवढा निधी खर्च करूनही रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरले गेले नाहीत. काही ठिकाणी दुरुस्ती केलेल्या कामाचा दर्जाही समाधानकारक नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सार्वजनिक निधीतून मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यानंतरही नागरिकांना अपेक्षित दर्जाचा रस्ता मिळत नसेल, तर संबंधित कामाची गुणवत्ता तपासणे आवश्यक असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. या कामामध्ये अनियमितता अथवा गैरप्रकार झाला आहे का, याची स्वतंत्र व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
चौकशी पूर्ण होऊन कामाची गुणवत्ता व मोजमाप यांची खातरजमा होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे बिल अदा करू नये, असेही निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, सार्वजनिक निधीतून केलेल्या रस्ते कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
त्यामुळे या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणेने पाहणी करावी, दोष आढळल्यास जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सोनोरीचे माजी सरपंच बाळासाहेब काळे यांनी केली आहे. या वेळी लक्ष्मण पवार, आनंद काळे, सुनील शिंदे, शंकर काळे, विलास काळे, किसन काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते