Karvand Pudhari
पुणे

Purandar Karvand Season: पुरंदरच्या डोंगररांगांत करवंदाचा बहर; आदिवासींना उत्पन्नाची संधी

पुरंदरच्या सह्याद्री डोंगररांगांत यंदा करवंदाचा मोठा बहर, आदिवासी बांधवांसाठी उत्पन्नाची संधी, तर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटनालाही चालना.

पुढारी वृत्तसेवा

सासवड: किल्ले पुरंदरच्या दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगांत यंदा करवंदाच्या जाळ्यांना मोठ्या प्रमाणावर बहर आला आहे. हिरव्यागार वनराईत फुललेली करवंदाची झुडपे, रानफुले आणि औषधी वनस्पतींमुळे परिसराचे निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे.

‌‘काळी मैना‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांमुळे स्थानिक आदिवासी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी, देवडी, मिसाळवाडी, बहिरवाडी आणि घेरा पुरंदर परिसरात महादेव कोळी समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून, उन्हाळ्यातील प्रमुख उत्पन्नाचे साधन म्हणून करवंदाला विशेष महत्त्व आहे.

यंदा करवंदाच्या जाळ्यांवर चांगला फुलोरा आल्याने उत्पादन वाढण्याची चिन्हे आहेत. डोंगररांगांत पसरलेल्या या नैसर्गिक संपत्तीमुळे पर्यटकांचेही लक्ष वेधले जात असून, स्थानिक महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

मात्र, गेल्या दोन वर्षांत दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे रानमेवा मुख्य बाजारपेठेत पोहोचविण्यात अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. यंदा परिस्थिती सुधारेल आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळेल, अशी आशा ग््राामस्थ व्यक्त करीत आहेत.

पुरंदरच्या डोंगररांगांत करवंदाचा भरघोस बहर

देवडीचे सरपंच नीलेश यादव यांनी सांगितले, की यंदाचा बहर लक्षात घेता आदिवासी कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वाहतूक सुविधा सुधारल्यास स्थानिकांना या नैसर्गिक संपत्तीचा अधिक लाभ घेता येईल. पुरंदरच्या दक्षिण भागातील निसर्गबहर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधींमुळे यंदाचा उन्हाळा आदिवासी समाजासाठी आशादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT