Land Pudhari
पुणे

Saswad Land Fraud Case: ४ लाखांच्या कर्जापोटी जमिनीचा ताबा अडवला? सासवडमध्ये ४० लाखांची मागणी केल्याचा आरोप

व्याजासह ७ लाख ८४ हजार रुपये दिल्याचा फिर्यादीचा दावा; कुलमुखत्यारपत्र रद्द न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सासवड: आर्थिक अडचणीचा फायदा घेत व्याजाने दिलेल्या पैशांच्या व्यवहारातून जमिनीच्या मालकी हक्कावरून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सासवडमधील दोघांविरुद्ध करण्यात आला आहे. ४ लाख २३ हजार रुपयांच्या व्यवहारापोटी जमीन तारण दिल्यानंतर व्याजासह ७ लाख ८४ हजार रुपये दिल्याचा दावा फिर्यादी योगेश बापूराव कोलते यांनी केला आहे. तरीही कुलमुखत्यारपत्र रद्द करण्याऐवजी जमीन परत देण्यासाठी ४० लाख रुपयांची मागणी झाल्याचा आरोप आहे. कोलते यांनी सासवड पोलीस ठाण्यात प्रदीप अंकुश जगताप आणि अंकुश रायचंद माने (दोघेही रा. सासवड, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

कोलते यांनी २०१९ मध्ये सासवडच्या व्यंकटेश नंदनवन सोसायटीत ३० लाखांची सदनिका घेतली; १० लाख रोख दिले आणि २० लाखांचे बँक कर्ज घेतले. कोरोना काळात उत्पन्न थांबले आणि वडिलांच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च आल्याने ते अडचणीत आले. त्यावेळी माने याने जगताप दहा टक्के व्याजाने पैसे देतो, असे सांगून ओळख करून दिल्याचा दावा आहे.

चार लाखांच्या मागणीवर जमीन तारण ठेवण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार २७ जून २०२३ रोजी सासवडमधील गट क्रमांक १२५/३/ब मधील एक आर जमीन कुलमुखत्यारपत्राद्वारे जगताप यांना दिली. त्यापोटी २० जून रोजी ५० हजार, २८ जून रोजी १ लाख ७३ हजार (एनईएफटी) आणि १ जुलै रोजी २ लाख (धनादेश) असे एकूण ४ लाख २३ हजार रुपये मिळाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

१८ ऑगस्ट २०२३ रोजी कोलते यांनी त्याच जमिनीवर गौरव काळुराम यादव यांच्याकडून १६ लाख रुपये घेतले. त्यातून ३० ऑगस्टला जगताप यांना दोन महिन्यांचे व्याज म्हणून ८४ हजार रुपये ऑनलाइन दिले. मूळ रक्कम परत करायला गेले असता, व्यवहार परवडत नसल्याचे सांगून कुलमुखत्यारपत्र रद्द करण्यासाठी ७ लाख रुपये द्यावे लागतील, असे जगताप यांनी सांगितल्याचा आरोप आहे.

त्यानुसार ६ सप्टेंबर २०२३ रोजी जनसेवा सहकारी बँकेतून जगताप यांच्या अ‍ॅक्सिस बँक खात्यावर ७ लाख रुपये आरटीजीएसने जमा केले. तरीही जमीन तारणमुक्त झाली नाही. मध्यस्थ माने याच्याकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नाही; उलट जमीन हवी असल्यास ४० लाख द्यावे लागतील, अन्यथा परत मिळणार नाही, अशी धमकीवजा मागणी झाल्याचा आरोप आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT