सासवड: मारहाण का करता या कारणावरून एकाला नग्न करून त्याचा व्हिडीओ काढून लाकडी दांडक्याने, कोयत्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 17) घडली. याप्रकरणी सुनील रामचंद्र खेडेकर, रामचंद्र यशवंत खेडेकर, आनंद रामचंद्र खेडेकर आणि गौरव भाउसो खेडेकर (सर्व जण रा. गुरोळी, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दीपक रामचंद्र खेडेकर (रा. गुरोळी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी दीपक खेडेकर हे रविवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास मंगेश रमेश खेडेकर यांच्या गोठ्यावर गुरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुनील खेडेकर यांनी फोन करून विराज कोलते यास घेण्यासाठी पाठविल्याने दीपक हे सुनील यांच्या पोल्ट्रीवर गेले. (Latest Pune News)
त्याठिकाणी सुनील खेडेकर, रामचंद्र खेडेकर व आनंद खेडेकर हे विराज कोलते व मयंक कोलते यांना मारहाण करीत होते. त्यांनी का मारता अशी विचारणा करीत याचे शुटिंग करण्यासाठी दीपक यांनी मोबाईल काढला. त्यावेळी गौरव खेडेकर याने तो मोबाईल हिसकावून खाली फेकून दिला व शिवीगाळ करीत सुनील खेडेकर, रामचंद्र खेडेकर, आनंद खेडेकर व गौरव खेडेकर यांनी व्हीडीओ काढतो का असे म्हणून मारण्यास सुरवात केली.
त्यानंतर पोल्ट्रीमध्ये नेत आनंद खेडेकर याने तेथे पडलेले कॅरेट डोक्यात मारले तसेच रामचंद्र खेडेकर यांनी डोक्यात, हातावर व मांडीवर काठीने मारहाण केली. या वेळी सुनील खेडेकर याने तेथील कोयता डोक्यात मारला. याचवेळी अंर्तवस्त्रे काढीत त्याचा व्हिडीओ काढला व तू कोणास सांगितल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे दीपक यांच्या तक्रारीत नमूद आहे.