आळंदी: आळंदी नगरपरिषद क्षेत्राची प्रारूप प्रभागरचना प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नगरविकास विभाग यांना सादर केला होता. या प्रस्तावास विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली. या प्रभागरचनेच्या वेळापत्रकानुसार ही प्रारूप प्रभागरचना सोमवारी (दि. 18) प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर नागरिकांना दि. 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना लेखी स्वरूपात नोंदविता येणार आहेत.
प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीची संधी देण्यात येईल. मात्र, मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नसल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.
यापूर्वीच्या 2017 निवडणूक प्रभागरचनेत 9 प्रभाग होते. त्यात एक प्रभाग वाढला असून, आता 10 प्रभागांची रचना करण्यात आली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष व 18 नगरसेवकांची संख्या होती. त्यामध्ये 3 नगरसेवक वाढले असून, आता एकूण संख्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व 21 नगरसेवक अशी झाली आहे. या बदलामुळे लोकसंख्येनुसार तीन लोकप्रतिनिधी वाढले असून, याचा लाभ संबंधित प्रभागाच्या विकासाला होणार आहे.
ही प्रभागरचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल. नागरिकांनी या कालावधीत आपल्या हरकती व सूचना लेखीस्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभागरचनेत फोडाफोडी कोणाच्या पथ्यावर
शहरात प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, नव्या प्रभागरचनेत नवे प्रभाग आणि नव्या मतदारसंख्येची रचना नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत तर्क लावले जात आहेत. अनेक प्रस्थापित नेत्यांना रचनेत अडचण वाढली असून, काही मुरब्बी नेत्यांनी मात्र यात नवी स्वप्ने बांधण्यास सुरुवात केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.