Assault Pudhari
पुणे

Saswad Gang Crime: सासवडमध्ये तरुणांच्या टोळ्यांचा वाढता प्रभाव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हाणामारी, दहशत, हप्तेखोरी आणि जमिनीच्या वादांमुळे सासवडच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

सासवड: सासवड शहरासह ग््राामीण भागात अलिकडच्या काळात तरुण व किशोरवयीन मुले गट तयार करून गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रकार चिंताजनकरीत्या वाढत आहे. परिसरात दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध नावांनी टोळ्या स्थापन केल्या जात आहेत. या माध्यमातून तरुणाईला हाणामारी, दहशत, हप्तेखोरी आणि संघटित गुन्हेगारीकडे ढकलले जात असल्याची चर्चा आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सासवडची सामाजिक ओळख धूसर होत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतींचा विस्तार होत आहे. त्यातच दुसरीकडे शहरासह परिसरात अवैध वसाहती वाढत असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः कोंढवा-पुणे मार्गावरील हिवरे रस्त्यालगत उभी राहिलेली खंडोबानगर वसाहत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

या गटांच्या माध्यमातून किरकोळ वादातून हाणामाऱ्या, दहशत निर्माण करणे, जमिनीच्या वादात हस्तक्षेप, हप्तेखोरी, अवैध धंद्यांना संरक्षण देणे, असे प्रकार वाढत असल्याने सामाजिक शांततेला तडा जात आहे. काही तरुण गुन्हेगारीचे अनुकरण करीत गंभीर गुन्ह्यांकडे वळत असल्याने पालकांमध्येही चिंता वाढली आहे.

पोलिसांवर दगडफेक; 90 हून अधिकांवर गुन्हे

शनिवारी (दि. 18 एप्रिल) रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर जमावाने एकमेकांवर तसेच पोलिसांवर दगडफेक करीत परिसरात तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी 90 हून अधिक जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, या घटनेनंतर शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

ग््राामीण भागातील शेतकरीवर्गातही या टोळक्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलोपार्जित जमिनींवर दबाव टाकणे, व्यवहारात हस्तक्षेप करणे किंवा धमकाविण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आपली जमीन सुरक्षित राहील का? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडू लागला आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

स्थानिक पातळीवरील काही राजकीय कार्यक्रमांमध्ये या गटांतील तरुणांचा सहभाग वाढत असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना यंत्रणा प्रभावीपणे पुढे येत नसल्याची टीका होत आहे. परिणामी, अशा टोळ्यांचे मनोबल वाढत असून, सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव होत चालली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करून संघटित टोळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सासवडकरांकडून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT