पुणे: ससून रुग्णालयातील परिचारिकांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याने काही रुग्णांचा ससूनमधील मुक्काम लांबला आहे, तर काही रुग्णांना भरती करून घेण्यात आलेले नाही.
बाह्यरुग्ण विभागात औषधोपचार करून नियोजित शस्त्रक्रियांसाठी काही दिवसांनी बोलावण्यात येत आहे. उपलब्ध मनुष्यबळामध्ये आपत्कालीन उपचार आणि शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्या आहेत. (Latest Pune News)
सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे मागच्या गुरुवारपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातही परिचारिकांनी संप पुकारला. मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळापर्यंत संप सुरू राहणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. एकूण परिचारिकांपैकी जवळपास निम्म्या परिचारिका संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवरही परिणाम झाला आहे.
रुग्णालयाच्या जुन्या आणि नवीन इमारतीतील वॉर्डमधील रुग्णांची गर्दी नेहमीपेक्षा कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. कान-नाक-घसा विभाग, नेत्रविभाग, बालरोग विभाग, अस्थिरोग विभाग अशा वॉर्डमध्ये तुरळक संख्या दिसून आली. आपत्कालीन विभाग, स्त्रीरोग विभागामध्ये परिचारिका आणि रुग्णांची वर्दळ पहायला मिळाली. एकूण संख्येपैकी 40 टक्के परिचारिका संपावर गेल्याने उर्वरित मनुष्यबळ विविध विभागांमध्ये गरजेनुसार कार्यरत ठेवण्यात आले आहे.
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी सांगितले, एकूण 900 परिचारिकांपैकी सुमारे सध्या 373 परिचारिका संपावर आहेत. नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थीही रुग्णसेवेसाठी हजर झाले आहेत. भारती हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, डीवाय पाटील मेडिकल कॉलेज, काशिबाई नवले मेडिकल कॉलेज आणि सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज यांच्याकडे नर्सिंगचे विद्यार्थी पाठवण्याबाबत संपर्क साधण्यात आला आहे. आतापर्यंत 48 विद्यार्थिनी रुजू झाल्या आहेत. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असल्या तरी आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही.- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय.