

2025 Polytechnic admission second round seat allotment
पुणे: राज्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या दुसर्या प्रवेश फेरीत तब्बल 51 हजार 223 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने ही गुणवत्ता यादी जाहीर केली. या फेरीसाठी 63 हजार 460 विद्यार्थ्यांनी पर्याय भरले होते, त्यापैकी 80.30 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 ते 24 जुलै या कालावधीत संबंधित संस्थेमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांसह प्रवेश घ्यावे लागणार आहेत.
राज्यभरात पॉलिटेक्निकच्या 1 लाख 20 हजार 574 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी राज्यभरातून तब्बल 1 लाख 40 हजार 286 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यापैकी पहिल्या फेरीतच 48 हजार 835 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
या फेरीसाठी 63 हजार 788 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी 87 हजार 976 विद्यार्थी पात्र होते. या पात्र विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 460 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले होते. या फेरीत पसंतीक्रम भरलेल्या 80.30 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, ही संख्या 51 हजार 223 इतकी आहे. यामधील पहिले तीन पर्यायांपैकी प्रवेश मिळालेले विद्यार्थी 28 हजार 902 इतके आहेत.
या विद्यार्थ्यांना त्यांनी पसंतीक्रम दिलेल्या पहिल्या ते तिसर्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 ते 24 जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे. जे विद्यार्थी चौथ्या किंवा त्यानंतरच्या पसंतीनुसार जागा मिळाल्याने समाधानी आहेत, त्यांनी ‘फ्रीझ’ पर्याय निवडून प्रवेश निश्चित करावा. मात्र, ज्यांना पुढील फेरीत चांगली संधी मिळू शकते असे वाटत असल्यास त्यांनी ‘नॉट फ्रीझ्ड’ पर्याय निवडावा असेही आवाहन केले आहे.
या दुसर्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी 25 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर 26 व 27 जुलै या दोन दिवसात पर्याय भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. यानंतर तिसरी प्रवेश फेरी 29 जुलै जाहीर केली जाणार आहे.
द़ृष्टीक्षेपात पॉलिटेक्निक प्रवेश
संस्थांची संख्या : 384
प्रवेशक्षमता : 1,20,574
अर्ज केलेले विद्यार्थी: 1,40,286
पहिल्या फेरीत झालेले प्रवेश : 48,835
दुसरी फेरीत मिळालेले प्रवेश : 51,223
दुसरी फेरी प्रवेशाचा कालावधी : 22 ते 24 जुलै