

पुणे: उच्चपदस्थ पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर नजर ठेवण्यासाठी पतीने स्वतःच्याच घरातील बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवून तिच्या अंघोळीचे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पत्नीला ब्लॅकमेल केल्याची घटना उघड झाली आहे.
पीडित महिलेने याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अधिकारी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला ही 30 वर्षे वयाची असून, ती उच्चपदस्थ अधिकारी आहे. तिचे सन 2020 मध्ये आरोपी पतीसोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर पतीने तिच्यावर सतत संशय घेऊन मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. (Latest Pune News)
पती तिला शिवीगाळ, मारहाण करून वारंवार माहेराहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. दीड लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी तो जबरदस्ती करीत होता. पुढे संशयातून त्याने पत्नीवर सतत नजर ठेवण्यासाठी घरात, विशेषतः बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसविले.
तिच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिला. या अत्याचारासोबतच सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाइकांनीही तिला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.
पतीकडून सातत्याने होणारा मानसिक व शारीरिक छळ आणि ब्लॅकमेलिंग सहन न होऊन पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. तिने पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास आंबेगाव पोलिस करीत आहेत.