Sassoon Hospital Kidney Transplant Pudhari
पुणे

Sassoon Hospital Kidney Transplant: वडिलांनी दिली किडनी, मुलाला मिळाले नवजीवन; ससूनमध्ये यशस्वी प्रत्यारोपण

आर्थिक अडचणीत अडकलेल्या ३३ वर्षीय तरुणाला वडिलांचे अवयवदान; ससून रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील एका नामांकित खासगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्‌‍या अत्यंत गरीब कुटुंबातील 33 वर्षांच्या तरुणाला ऑक्टोबर 2024 मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडनी खराब झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी यावर उपाय म्हणून किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. किडनी खराब झाल्याने त्याचे कामही बंद झाले. अशा परिस्थितीत वडिलांनी किडनी देऊन मुलाला नवजीवन दिले.

तरुणावर ऑक्टोबर 2024 पासूनच अकलूज येथील खासगी रुग्णालयामध्ये डायलिसिस सुरू केले. रुग्ण व त्याचे वडील, बहीण यांनी शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणाची चौकशी केली. त्यांना हा खर्च 10-11 लाखांच्या घरात जात असल्याचे समजले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने इतका खर्च करणे शक्य नव्हते. दरम्यान, ससून रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपण होत असल्याची माहिती कुटुंबाला समजली.

ससून रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे व अरुण बनसोडे यांनी कुटुंबीयांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर किडनी प्रत्यारोपणासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. रक्ताच्या नात्यातील व्यक्ती दान करू शकते, याबाबत माहिती मिळाल्यावर वडील तातडीने तयार झाले. मूत्रपिंडरोगतज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडीकर व डॉ. निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यावर वडील अवयवदान करू शकत असल्याचे समजले. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार सर्व कायदेशीर मान्यतेचा प्रस्ताव विभागीय मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समितीने पाठविला. पूर्ण प्रस्ताव व सर्वांच्या मुलाखती घेतल्यानंतर मान्यता देण्यात आली.

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लता भोईर व मानवी अवयव प्रत्यरोपण कार्यक्रमप्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ससून रुग्णालयात करण्यात आली.

मेडिसिन विभागप्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, डॉ. संजय मुंढे, पथकप्रमुख डॉ. हर्षल भितकर, डॉ. निरंजन आंबेकर व डॉ. संदीप मोरखंडीकर, किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल व डॉ. विवेक बरेकर, डॉ. शार्दूल दाते, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षीरसागर व त्यांचे सर्व निवासी डॉक्टर्स, मुख्य अधिसेविका विमल केदारी, ट्रान्सप्लांट ऑपेरेशन थिएटरच्या मुख्य परिसेविका राजश्री कानडे, त्यांच्या सर्व अधिपरिचारिका व स्टाफ यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT