पुणे

Sassoon Hospital : ससूनच्या ‘त्या’ डॉक्टरांवर होणार कारवाई..!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससूनचे काही डॉक्टर आणि खासगी औषध विक्रेत्यांचे साटेलोटे असल्याचे वृत्त 'दैनिक पुढारी'ने 9 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले. डॉक्टर खासगी औषध विक्रेत्यांकडून औषधे मागवतात आणि नातेवाइकांडून पैसे घेतात, ही धक्कादायक बाब समोर आली. यानंतर ससून प्रशासनाचे धाबे दणाणले असून, दोषी डॉक्टरांवर तत्परतेने कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ससूनमध्ये दररोज हजारो गरीब आणि गरजू रुग्ण उपचारांसाठी येतात. मोफत उपचार आणि औषधे मिळावीत, ही त्यांची अपेक्षा असते.

ससूनला औषधांसाठी निधी कमी पडू नये आणि सर्व औषधे रुग्णालयातच मोफत उपलब्ध व्हावीत, यासाठी स्थानिक औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असतानाही ससूनमधील डॉक्टरांकडून रुग्णांची फसवणूक केली जात आहे. रुग्णांची फसवणूक होऊ नये आणि डॉक्टरांवर कारवाई व्हावी, यासाठी संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश अधिष्ठाता यांच्याकडून देण्यात आले. त्यासाठी तीनसदस्यीय समिती नेमण्यात आली. समितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, औषधशास्त्र विभागाच्या डॉ. संगीता दाभाडे आणि मेडिसीन विभागाचे डॉ. संजय मुंडे यांचा समावेश आहे. समितीकडून सुरक्षारक्षक, कर्मचारी, डॉक्टर, रुग्ण असे सर्वांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

अनेक प्रश्न उपस्थित

ससूनमध्ये सर्व औषधे मोफत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला जातो. असे असतानाही रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे का सांगितले जाते, बाहेरची औषधे आणायला का परवानगी दिली जाते, स्वत:चे खिसे भरायला खासगी औषध विक्रेत्यांना झुकते माप का दिले जाते, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT