पुणे

Sassoon drugs racket case : ससून कैद्यांसाठी आजारांचे निकष ठरवणार का? किरकोळ आजारासाठीही होतात दाखल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात अपचन, डोकेदुखी अशा किरकोळ आजारांसाठी कैदी रुग्णांना दाखल करण्यात येत असल्याचे ललित पाटील प्रकरणानिमित्त समोर आले. रुग्णालयात दाखल होण्यासाठी कैदी आजारी असल्याचे नाटक करतात. त्यामुळे आतातरी कैद्यांना दाखल करून घेताना आजारांची वर्गवारी ससूनकडून ठरवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ललित पाटीलला क्षयरोग, हर्निया, उच्च रक्तदाब, असे विविध आजार असल्याचे त्याच्या 'मेडिकल रिपोर्ट'वर नोंदविण्यात आले होते.

ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह 6 डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत होते. पळून गेल्याच्या दुसर्‍या दिवशी पाटीलची हर्नियाची शस्त्रक्रिया केली जाणार, असेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात, पाटील पळून गेल्यापासून दहा दिवसांनी पकडला गेला. त्यादरम्यान त्याला कोणत्याही उपचारांची गरज भासली नाही. त्यामुळे ससूनने नोंदविलेल्या आजारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

चाळिशीनंतर बहुतांश जणांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. हे आजार असलेला सामान्य माणूसही दररोज औषध घेऊन आपला दिनक्रम सुरू ठेवत असतो. सहव्याधींसाठी दररोज डॉक्टरकडे जाण्याची किंवा वारंवार अ‍ॅडमिट होण्याची गरज भासत नाही. कैद्यांना मात्र किरकोळ आजारांसाठी थेट रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे कारागृहापेक्षा रुग्णालयातील मुक्काम बरा, या विचारानेच कैदी जाणीवपूर्वक ससूनमध्ये दाखल होत असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. अर्थात, डॉक्टर आणि पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय हे घडू शकत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.

सामान्य रुग्णांना एक, तर कैद्यांना दुसरा न्याय

ससून रुग्णालयात सामान्य रुग्णांनाही आवश्यकतेशिवाय जास्त काळ ठेवले जात नाही. शस्त्रक्रियेचे नियोजन लांबल्यास रुग्णांना अ‍ॅडमिट करून घेण्याऐवजी घरी पाठविले जाते आणि शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी अ‍ॅडमिट होण्यास सांगितले जाते. अत्यवस्थ रुग्णही एक महिन्याहून अधिक काळ ससूनमध्ये ठेवले जात नाहीत. कैद्यांना मात्र याबाबतीत वेगळा न्याय दिला जातो. त्यासाठी वरिष्ठांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सगळ्यांचे हात ओले केले जातात, असे ससूनमधील एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कारागृहात उपचारांची सोय का नाही?

येरवडा कारागृहात कैद्यांवरील प्राथमिक उपचारांसाठी डॉक्टर उपलब्ध असतात. किरकोळ आजार किंवा सहव्याधींवरील उपचारांसाठी त्या डॉक्टरांकडून औषधोपचार केले जाऊ शकतात. मात्र, 'हाय प्रोफाईल' कैद्यांसाठी कारागृहाकडून सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. राजकीय व्यक्तींकडून दबाव निर्माण करून कैद्यांना ससूनमध्ये दाखल केले जाते, अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT