पुणे

Sassoon drug case : मटका किंग विरल सावलाही कारागृहात

अमृता चौगुले

पुणे : वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली ससून रुग्णालयात तब्बल नऊ महिने तळ ठोकून असलेला मटका किंग विरल सावला याचीही येरवडा कारागृहात रवानगी झाली आहे. एकाच दिवशी चारते पाच कैद्यांना कारागृहात धाडण्यात आले. अशी तत्परता यापूर्वी का दाखवण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ड्रग तस्कर प्रकरणातील ललीत पाटील याने ससूनमधून पलायन केल्यानंतर वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दिवस काढत असलेल्या आरोपींचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

दरम्यान, दै. 'पुढारी'ने 'कोणी एक महिना तर कोणी नऊ महिने तळ ठोकून!' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करत लक्ष वेधले होते. कैद्यांना अनेक महिन्यांपासून ससूनमध्ये आश्रय दिला जात असल्याबद्दल वरिष्ठ पातळीवरूनही चौकशीला सुरुवात झाली. दरम्यान, कैद्यांना आम्ही सामान्य रुग्ण म्हणूनच वागणूक देत असून, त्यांना उपचारांची गरज असल्याने अ‍ॅडमिट करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. राजकीय व्यक्तींकडून कैद्यांना रुग्णालयात ठेवून घेण्याबाबत दबाव टाकला जात असल्याचीही चर्चा होती.

ललीत पाटीलच्या पलायनानंतर प्रकरण अंगाशी येताच सर्व दबाव झुगारून तातडीने कैद्यांना कारागृहात पाठवण्यात आले. दोन ते नऊ महिन्यांपासून अ‍ॅडमिट असलेले कैदी रुग्ण अचानक बरे झाले का, आता त्यांना उपचारांची गरज नाही का, की याआधी उपचारांचा केवळ 'फार्स' केला जात होता, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

आठवडाभरात पाच कैदी पुन्हा कारागृहात

ड्रग तस्कर ललीत पाटील थेट ससून रुग्णालयातून ड्रग विक्रीचे रॅकेट चालवत होता. त्याचा पोलिसांच्या पुणे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणामुळे ससून रुग्णालयात कैदी वॉर्ड क्रमांक 16 मध्ये कशा प्रकारे विविध प्रकरणांतील आरोपींची बडदास्त ठेवली जात होती, हे समोर आले. कारागृह प्रशासनाला हाताशी धरून वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली ही मंडळी ऐशोआरामात दिवस काढत होती. मात्र, पाटील पळाला आणि आरोपीसह ससून रुग्णालयाचा कारनामा चव्हाट्यावर आला आणि त्यानंतर आठवड्याभरात पाच कैद्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले.

पुन्हा कारागृहात पाठवण्यात आलेले कैदी कोण?

विरल सावला
अनिल भोसले
रुपेश मारणे
हेमंत पाटील

ससून पोलिस गार्डसाठी समिती

ससून पोलिस गार्डसाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती ससूनमधील कैदी वॉर्ड क्रमांक 16 ची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी करणार असून, तेथे लावण्यात येणार्‍या पोलिस गार्डच्या कर्तव्याचादेखील आढावा घेणार आहे. अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा या तिघांचा या समितीमध्ये समावेश आहे.

ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आरोपींना येरवडा कारागृहातून दाखल करण्यात येते. तेथील सुरक्षेची जबाबदारी शहर पोलिसांच्या कोर्ट कंपनीच्या गार्डची असते. त्यासाठी दोन सत्रांत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाते. कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, असे असताना देखील ललित पाटील तेथूनच ड्रग विक्री करताना आढळून आला. त्यामुळे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी आता ही समिती नेमली आहे. ही समिती कोर्ट कंपनी येथे नेमणुकीस असलेले कर्मचारी किती दिवसापासून काम करतात, त्यांच्याकडून कर्तव्य करताना कोणत्या चुका होतात. त्याचबरोबर ससून रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये कोण-कोणत्या सुधारणा करणे गरजेचे आहे, या सर्व बाजूने पाहणी करून त्याचा अहवाल पोलिस आयुक्तांना देणार आहे.

वरिष्ठ अधिकारी देणार भेट

आतापर्यंत या प्रकरणात एका महिला पोलिस अधिकार्‍यासह 9 कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्तांनी निलंबित केले आहे. तर त्या वॉर्डमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या गार्डची दररोज तपासणी करण्याच्या सूचना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. त्याच्या नोंदी ठेवण्यास सांगितले आहेत. तसेच अपर पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना सरप्राईज व्हिजिट देण्यास सांगितले आहे.

ललीतचे साथीदार येरवडा कारागृहात

सून रुग्णालयातून ड्रग्ज विक्री प्रकरणातील तस्कर ललीत पाटील याच्यासह तिन्ही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी झडती घेतली आहे. त्यात पेन ड्राइव्ह आणि मोबाईल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. त्यातील डेटाचे विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती सरकारी वकील वामन कोळी यांनी न्यायालयाला दिली.

दरम्यान, या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला पाटील याचा साथीदार सुभाष मंडल (वय 29, रा, देहू रस्ता; मूळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहिम शेख (वय 19, रा. ताडीवाला रस्ता) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस मुख्य आरोपी ललित पाटील (वय 34), भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि अभिषेक विलास बलकवडे यांचा शोध घेत आहेत.

पाटील याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा वाहनचालक दत्ता डोके यालादेखील अटक करण्यात आली असून, तो सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी केला. बचाव पक्षातर्फे शिवप्रसाद साळुंके यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT