Sarasbaug Mahalakshmi Pudhari
पुणे

Navratri Sarasbaug Mahalakshmi: सारसबागच्या श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची धूम; २ किलोचा सोन्याचा मुकुट ठरणार आकर्षण

११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम; अष्टलक्ष्मी मिरवणूक, जिवंत देखावा आणि भव्य रावणदहनाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. रविवार (दि. ११) ते मंगळवार (दि. २०) या कालावधीत नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम रंगणार आहेत. रविवारी (दि. ११) नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.

तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल. 'शृंगार' या संकल्पनेवर आधारित मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येणार असून, मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील या संकल्पनेवर साकारले जाणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती, तसेच त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित केला आहे. पत्रकार परिषदेला मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, सोमवारपासून (दि. १२) रोज सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शक्तीचा सन्मान मंदिरात होणार आहे. यामध्ये अनुक्रमे महिला शेतकरी आणि कृषी उद्योजिका, महिला शास्त्रज्ञ, महिला पोलीस अधिकारी, महिला वैमानिक, महिला जिल्हाधिकारी, विविध कंपन्यांमधील महिला मानव संसाधन व्यवस्थापक, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला, महिला उद्योजिकांच्या सन्मान सोहळ्याचा समावेश आहे. याशिवाय दहा दिवसांत अभिषेक, याग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ६ वाजता सामूहिक श्रीसूक्त पठण होणार आहे. यामध्ये हजारो महिला आणि पुरुष देवीभक्त सहभागी होणार आहेत. महापौर मंजूषा नागपुरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

यंदाचे वैशिष्ट्य: अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक, जिवंत देखावा

मंगळवारी (दि. १३) रात्री ८.३० वाजता अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक आयोजित केली आहे. तसेच, ललिता पंचमीला गुरुवारी (दि. १५) दुपारी ३.३० वाजता कन्यापूजन कार्यक्रम आणि शुक्रवारी (दि. १६) गाथा शिवशंभूंची हा जिवंत देखावा ही यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय रक्तदान आणि आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ढोल-ताशा वादनसेवा, नृत्यातून देवी आराधना, बँजो वादन, माता की चौकी यासह सोमवारी (दि. १९) रात्री ८.३० वाजता मंदिरासमोर सामूहिक गरबा होणार आहे.

श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी व रावण दहन कार्यक्रम

दसऱ्याच्या दिवशी मंगळवारी (दि. २०) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. तर रात्री ९.३० वाजता भव्य रावणदहन कार्यक्रम देखील होणार आहे. विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रावणाची प्रतिकृती साकारली आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ५ कोटी रुपयांचा विमा घेण्यात आला आहे.

श्री महालक्ष्मी देवीला २ किलोंचा सोन्याचा मुकुट

यंदा 'शृंगार' हा संकल्पना असून, याला अनुसरून घटस्थापनेच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला नवा सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. हा मुकुट २ किलो वजनाचा असून, यामध्ये आकर्षक नक्षीकाम व कलाकुसर केली आहे. यामुळे भक्तांना मुकुट परिधान केलेले देवीचे मनोहारी रूप पाहण्याची संधी पहिल्या दिवसापासून मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT