

पुणे: राज्य सरकारने दि. १५ ऑक्टोबरपासून पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला असला, तरी पुणे शहरात प्रत्यक्ष पाणीकपात लागू करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्य सरकारकडून यासंदर्भातील लेखी अध्यादेश महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतरच पाणीकपातीचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, अशी भूमिका महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे १०० टक्के भरलेली असतानाही उन्हाळ्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
त्यानुसार आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी राज्यातील पाणीस्थितीचा आढावा घेत दि. १५ ऑक्टोबरपासून पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वांना लागू राहणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेलाही त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाठ्यात एक टीएमसीने घट
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे सध्या १०० टक्के भरली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाठ्यात सुमारे एक टीएमसीने घट असली, तरी उपलब्ध पाणीसाठा आणि पावसाची स्थिती लक्षात घेता योग्य नियोजन केल्यास हा साठा जुलैअखेरपर्यंत पुरू शकतो, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला दि. १६ ऑक्टोबरपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याचे दिवस, कपातीचे वेळापत्रक आणि उपलब्ध साठ्याचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
आठवड्यातून एक दिवस पाणी बंद?
उन्हाळ्यात पुणेकरांना पुरेसा पाणीपुरवठा करता यावा, यासाठी आतापासूनच काटकसरीने पाणी वापरण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. महापालिकेने यापूर्वीच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे शक्य होईल, अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारचा लेखी आदेश आवश्यक असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारचा अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून आठवडाभरात पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाईल, असे जगताप यांनी सांगितले.
महापौर-आयुक्तांच्या चर्चेनंतर निर्णय
गेल्या आठवड्यापासून महापौरांसह महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी परदेश दौऱ्यावर होते. तसेच आयुक्त वगळता अन्य अतिरिक्त आयुक्तही उपलब्ध नव्हते. आता महापौर पुण्यात परतल्या आहेत; मात्र, महापालिका आयुक्त सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा लेखी अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर महापौर आणि आयुक्त यांच्यात चर्चा करून पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.