पुणे: सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण करण्यात आली. या वेळी मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या आदिशक्तीच्या तीन रूपांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
ज्ञान, विद्या, बुद्धी आणि निर्मळतेचे प्रतीक असलेल्या महासरस्वती देवीला स्फटिक माळ अर्पण करण्यात आली. स्फटिक हे पवित्रता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर शक्ती, साहस आणि दुष्ट प्रवृत्तींच्या संहाराचे प्रतीक असलेल्या महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण करण्यात आली. रुद्राक्षाला हिंदू धर्मपरंपरेत विशेष आध्यात्मिक महत्त्व असून, त्याचा भगवान शिवाशी घनिष्ठ संबंध मानला जातो. नवरात्रोत्सवात देवीचरणी करण्यात आलेले हे माळार्पण श्रद्धा, भक्ती आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविणारे ठरले.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने देवींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्त मंडळाने केले आहे. 'उदे ग अंबे उदे...', 'आई राजा उदो उदो...' अशा जयघोषांनी दुमदुमणारे मंदिर परिसर, फुलांनी सजलेले देवीचे गाभारे, रंगबिरंगी विद्युतरोषणाई, धूप-अगरबत्तीचा दरवळ आणि दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा... अशा भक्तिमय वातावरणात शहर आणि उपनगरांतील देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
शुक्रवारी (दि. १६) नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेनिमित्त देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पारंपरिक वेशभूषेतील महिला, सहकुटुंब दर्शनासाठी आलेले नागरिक आणि तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसरांना यात्रेचे स्वरूप आले होते.
शहरातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर, सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी देवी मंदिर, सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर, सहकारनगर येथील तळजाईमाता देवस्थान, बुधवार पेठेतील काळी जोगेश्वरी मंदिर, शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिर आणि कर्वेनगर येथील वनदेवी मंदिरासह विविध देवी मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची वर्दळ होती. देवीच्या आरतीचा निनाद, घंटानाद आणि भक्तिगीतांच्या सुरांनी मंदिर परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये देवीची आकर्षक सजावट केली असून, फुलांच्या माळा आणि विद्युतरोषणाईने मंदिरांचे रूप खुलले आहे. विविध ठिकाणी देवीची विशेष पूजा, अभिषेक, आरती, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात येत आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. घरोघरी घटस्थापना केलेल्या भाविकांकडून देवीची आराधना केली जात असून, सायंकाळच्या आरतीवेळी भक्तीचा उत्साह अधिकच वाढत आहे.
मंदिर परिसरांना यात्रेचे स्वरूप
नवरात्रोत्सवामुळे मंदिरांच्या परिसरात फुले, हार, नारळ, ओटीचे साहित्य आणि प्रसाद विक्रीच्या दुकानांमध्ये लगबग वाढली आहे. मंदिरांकडे जाणाऱ्या मार्गांवर पूजेच्या साहित्यांसह खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सजले आहेत. देवीदर्शनानंतर भाविकांकडून खरेदीला पसंती दिली जात आहे. लहान मुलांचा किलबिलाट, विक्रेत्यांची लगबग आणि भाविकांची वर्दळ, यामुळे मंदिर परिसर गजबजले आहेत. सायंकाळनंतर विद्युत रोषणाईच्या झगमगाटात मंदिरांचे सौंदर्य अधिक खुलत असून, देवीच्या जयघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.
नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, भाविकांना एकत्र आणणारा भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मंडळाच्या वतीने देवीची आकर्षक सजावट, दैनंदिन आरती, भजन-कीर्तनासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महिला, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी स्वयंसेवकांमार्फत नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक एकोपा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.सौरभ जगताप, उपाध्यक्ष, श्री साईनाथ नवरात्र महोत्सव समिती, सोमवार पेठ