खोर: यवत (ता. दौंड) येथील मुक्कामानंतर मंगळवारी (दि. २४) श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा भांडगावमध्ये सकाळच्या न्याहारीसाठी विसावला. या आगमनानिमित्त गावात उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने रांगोळ्यांच्या पायघड्या घालत, फुलांची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत केले.
पालखी सोहळ्याचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात परिसर दुमदुमवून टाकला. महिलांनी रांगोळ्यांनी पायघड्या रचून पालखी मार्ग सुशोभित केला. पुष्पवृष्टी करत, पालखीच्या दर्शनासाठी लहानथोरांनी गर्दी केली. सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण भांडगाव ग्रामस्थ, महिला मंडळे, तरुण मंडळे आणि बालवारकरी सहभागी झाले होते. (Latest Pune News)
यावेळी पालखी सोहळा थेट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे मार्गस्थ झाला. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. श्रींच्या दर्शनासाठी परिसरातील गावांमधून आलेले वारकरी, भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. सकाळपासूनच विठ्ठलनामाचा गजर ऐकायला मिळत होता. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामस्थांनी विशेष नियोजन केले होते.
भांडगाव ग्रामस्थांच्या वतीने २०० किलो बेसनाचे पीठ, २५० किलो भात आणि तब्बल २० हजार भाकरीचे जेवण तयार करण्यात आले होते. याशिवाय गावातील दानशूर व्यक्तींनी चहा, नाश्ता, जेवण इत्यादींची सोय केली होती. यावेळी कुदळे कॉम्प्लेक्स च्या वतीने वारकऱ्यांना जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. त्यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही. या सेवा-कार्यामुळे ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
या सोहळ्यात राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दोरगे, सरपंच लक्ष्मण काटकर, उपसरपंच नंदा जाधव, मधुकर दोरगे, दत्तात्रय दोरगे, शाम कापरे, प्रमोद दोरगे, विजय दोरगे, रविंद्र जाधव, रवींद्र दोरगे, अमित दोरगे आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळच्या न्याहारीनंतर पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी चौफुला येथे दुपारच्या विसाव्यासाठी रवाना झाला. भांडगावच्या ग्रामस्थांनी केलेल्या प्रेमपूर्ण स्वागताने वारकरी भारावून गेले. ग्रामस्थांनी दाखवलेली सेवा, श्रद्धा आणि भक्तिभाव हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अनमोल वारसा जपत असल्याचे चित्र या सोहळ्यातून दिसून आले.