पाटस: जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा वरवंड (ता. दौंड) ते उंडवडी (ता. बारामती) हा सर्वात मोठा २३ किलोमीटरचा अवघड घाट वळणाचा टप्पा असल्याने तो पार करण्यासाठी पालखी सोहळ्याचे आगमन पाटस (ता. दौंड) गावात होताच सोहळ्याचे स्वागत केले. नेहमीप्रमाणे पालखी सोहळ्याला गावकऱ्यांनी गोड जेवणाचा स्वाद दिला. वारकऱ्यांनी पाटसकरांचे भरभरून कौतुक केले.
दौंड तालुक्यातील यवत येथे पहिला व वरवंड येथील मंगळवारी (दि. २४) दुसऱ्या दिवशी मुक्कामी असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि. २५) पहाटे ६ वाजताची आरती घेऊन तालुकावासियांना निरोप देण्यासाठी बारामती तालुक्यात उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पुढील मुक्कामासाठी निघाला होता, या दरम्यान दुपारच्या विसाव्यासाठी तो पाटस हद्दीत सकाळी साडे सात वाजता पोहचला, पाटस गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता या पालखी सोहळ्याचे आगमन झाले आहे. (Latest Pune News)
सकाळी ११ वाजता रोटी घाट पार करण्यासाठी हा पालखी सोहळा मंदिराबाहेर पडणार आहे. वरवंड (ता. दौंड) येथील मुक्काम उरकून पालखी सोहळ्याने पाटस दिशेने प्रवास सुरू केला असताना वरवंड येथून चार किमी अंतरावर असणाऱ्या पाटस हद्दीतील भागवतवाडी येथे पालखी सोहळ्याचे सकाळी पावणे आठ वाजता आगमन झाल्यावर नेहमीप्रमाणे वैष्णवांना चहा-नाष्टाची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी १५ मिनिटांची विश्रांती करत दुपारचा विसावा घेण्यासाठी पाटस येथील मुख्य चौकात सकाळी ९ वाजता या पालखी सोहळ्याचे आगमन होताच ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी पाटस गावच्या सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच छाया भागवत, पाटसचे ग्रामसेवक सयाजी क्षीरसागर, कुसेगावचे ग्रामसेवक भाऊसाहेब कांबळे, संभाजी देशमुख, स्वप्नील भागवत, गणेश चव्हाण, अशोकराव पानसरे, विकास कोळपे, वरवंड आरोग्य विभाग कर्मचारी, माणिक चोरमले, सागर शितोळे, शिवाजीबापू ढमाले, अमोल भागवत, आदी उपस्थित होते.
ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीने प्रवेश केल्यावर भाविकांना दर्शन खुले केले. पुढील प्रवासासाठी अवघड ठरणारा रोटी घाट पार करण्यासाठी सर्व वैष्णवांना पाटस गावाकडून नेहमीप्रमाणे गोड जेवणाचा स्वाद देण्यात आला.
ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरातून सकाळी ११ वाजता रोटी घाट पार करण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बाहेर पडणार आहे. यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्याने रोटी घाटात नैसर्गिक सौंदर्य निर्माण झाले आहे. हा पालखी सोहळा चौथ्यांदा घाट कसा पार करेल व घाट पार करण्यासाठी किती बैल जोड्यांची मदत घ्यावी लागेल हे दृश्य पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने रोटी घाटात हजेरी लावली आहे.
रोटी घाट पार करून हा पालखी सोहळा रोटी येथील अभंग आरती करत हिंगणीगाडा मार्गे वासुंदे येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री ८ वाजताच्या दरम्यान मुक्कामासाठी पोहचणार आहे.