पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या गुरुवारी (दि. ६) पुण्यात आगमन होणार आहे. त्यानिमित्त श्री विठ्ठल मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे.
टाळ-मृदंगांचा गजर आणि श्री विठ्ठलनामाचा जयघोष सगळीकडे दुमदुमणार आहे. या पार्श्वभूमीवर भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर आणि नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, मंदिरांमध्ये फुलांची सजावट, आकर्षक विद्युतरोषणाई, मंडप उभारणी, वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था तसेच धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे.
परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात असतो. यंदाही परतीच्या वाटेवर असलेल्या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. गुरुवारी (दि. ६) आणि शुक्रवारी (दि. ७) दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (दि. ६) सकाळी सहा वाजता मंदिरात येणार आहे. गुरुवारी (दि. ६) आणि शुक्रवारी (दि. ७) असे दोन दिवस पालखीचा मुक्काम मंदिरात असेल. शनिवारी (दि. ८) सकाळी १० वाजता पालखी सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराज पालखीचे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आगमन होणार आहे.
आगमनानंतर सायंकाळी ५.३० वाजता समाजारती, त्यानंतर महाप्रसाद, रात्री ८ वाजता कीर्तन, रात्री ९.३० वाजता शेजारती आणि रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत जागर होणार आहे. शुक्रवारी दिवसभर भाविकांना पालखीचे दर्शन घेता येणार आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ होईल, अशी माहिती मराठा मंडळ ट्रस्टच्या नवी पेठ श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष अविनाश गवारे आणि सचिव समीर पवार यांनी दिली.