शशिकांत जाधव
लोणंद: माउलींच्या पालखी सोहळ्यास भव्य आणि वैभवशाली स्वरूप देणारे पुण्यवान हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात बुधवारी दुपारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. दुपारी दोनच्या सुमारास पाडेगाव हद्दीत पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच पुष्पवृष्टी, फुलांचा हार आणि ‘माउली... माउली... माउली...’च्या अखंड जयघोषात जिल्हावासीयांनी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. याच वेळी पावसाचा शिडकावा होऊन माउ लींचे सातारा जिल्ह्यात जलधारांनी स्वागत केले.
यापूर्वी दुपारी दीडच्या सुमारास निरा नदीच्या दत्त घाटावर ‘श्रीं’च्या पादुकांना पारंपरिक विधीपूर्वक अभ्यंगस्नान घालण्यात आले. हा लोभस आणि भावस्पर्शी सोहळा पाहण्यासाठी निरा नदीच्या दोन्ही तीरांवर, दोन्ही पुलांवर तसेच नदीपात्र परिसरात सकाळपासूनच वारकरी आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ‘धन्य आज दिन झाले, संतांचे दर्शन झाले,’ अशी भावना व्यक्त करत हजारो भाविकांनी हा अविस्मरणीय सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला.
पुणे जिल्ह्यातील ७ मुक्काम पूर्ण करून पालखी सोहळ्याने बुधवारी पहाटे वाल्हे येथून प्रस्थान केले. पिंपरे बुद्रुक येथे न्याहरीनंतर सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी निरा नदीकाठी दाखल झाला. नदीच्या एका बाजूला पुणे, तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्हा असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील भाविक सकाळपासूनच मोठ्या संख्येने जमा झाले होते. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत असला, तरी ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मात्र, माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
तीन भोंगे संपल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पालखीने निरा येथून प्रस्थान केले. रथावरील सत्तावीस दिंड्या पुढे गेल्यानंतर माऊलींच्या पादुका जुन्या पुलावरून सातारा जिल्ह्याच्या तीरावर आणण्यात आल्या. पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांच्यासह मानकऱ्यांनी पादुका हातात घेऊन दत्त घाटावर नेल्या. यावेळी जुन्या पुलापासून घाटापर्यंत ‘माउली... माउली... माउली...’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या बॅरिकेडस्मध्ये माउलींना फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. तर स्नानाच्या वेळी गुलाब पाकळ्यांचा पुष्प वर्षाव करण्यात आला.
वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली होती. दत्त घाटावर विधिवत अभ्यंगस्नान होताच वारकऱ्यांनी आनंदाने पाणी उडवत भक्तिभाव व्यक्त केला. सातारा जिल्हा प्रशासन व पोलिसांनी काटेकोर नियोजन करून बॅरिकेडिंगद्वारे पादुकांना सुरक्षितपणे घाटावर नेले. त्यामुळे कोणताही गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडला नाही. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिरवळ रेस्क्यू टीम, एनडीआरएफ टीमने बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात दक्षता घेत भाविकांवर नियंत्रण ठेवले.
अभ्यंगस्नानानंतर पादुका पुन्हा रथात विराजमान करण्यात आल्या आणि पालखी सोहळा सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. नंतर पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव कॅनॉल, पाडेगाव पाटी, बाळू पाटलाची वाडी आदी ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अवघे सात किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे अडीच तास लागले आणि सायंकाळी ५ वा.च्या सुमारास पालखीचे लोणंदनगरीत आगमन झाले.
निरास्नानावेळी ऊन-पावसाचा खेळ
सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. उकाडा जाणवत होता, ऊन-सावलीच्या वातावरणातच माउलींचे निरास्नान व जिल्ह्यात स्वागत झाले. माऊलींच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर काही वेळ वरुणराजाने हजेरी लावली. जलधारांच्या साक्षीनेच माउलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यामध्ये आगमन झाले. त्यामुळे काही वेळ वारकऱ्यांना हायसं वाटलं; मात्र, पुन्हा ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला. माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी वारकऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले.