देहूगाव : पुढारी वृत्तसेवा: देहूगाव, देहूरोड परिसरामध्ये मकरसंक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सोमवारी सकाळपासूनच मंदिरामध्ये महिलांची गर्दी दिसून आली. या वेळी महिलांनी विठ्ठल रुक्मिणींची मनोभावे पूजा केली.
विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी वाण अर्पण केले. महिलांची देहूतील मुख्य मंदिरासह तसेच शंकर मंदिर, दत्त मंदिरात जाऊन वाण अर्पण केले. गाजर, बोर, उसाची कांडी, शेंगा, हरभरे, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचे कणीस, कापूस, वालाच्या शेंगा, घेवडा आदींचे वाण पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून महिलांनी दर्शन घेतले.
तसेच, मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुळशी वृंदावन तसेच मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर एकमेकींना तिळगुळ घेत हळदी-कुंकू लावून वाणाने ओटीभरण केले. मंदिर परिसरात महिला फेर धरून फुगड्या खेळताना दिसून आल्या. पूरण पोळीचा नैवेद्य देवदेवतांना दाखविला. काही महिलांनी मातीचे मडके आणून त्यात वाण घालून त्याची मनोभावे पूजा केली. तसेच, त्याच्या भोवती दोरा गुंडाळून हळद-कुंकू वाहून पूजा केली. तसेच, परिसरातील नागरिकांनी तिळगूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा