नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन हजार रुपये अनुदान मिळवून देतो, त्यासाठी तुमचे फाेटो काढावे लागतील असे सांगून अंगावरील दागिने काढण्यास भाग पाडून दोघा भामट्यांनी महिलांचे दागिने नेल्याची घटना द्वारका सर्कल परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा गोविंद खांबेकर (रा. चव्हाटा) या रविवारी (दि. १४) दुपारी १ च्या सुमारास त्यांच्या बहिणीसह द्वारका सर्कल येथे जात होत्या. त्यावेळी एक भामटा त्यांना भेटला व 'आमचे साहेब पुढे आहेत, ते तुम्हाला दोन हजार रुपये अनुदान मंजूर करून देतील' असे त्याने सांगितले. त्याने काठे गल्ली परिसरात दोघा महिलांना नेत तेथे दुसऱ्या भामट्यास भेटवून हे आमचे साहेब आहे असे सांगितले. तसेच तुमचे फोटो काढायचे आहे, त्यासाठी अंगावरील दागिने काढा असे दुसऱ्या भामट्याने सांगितले. त्यानुसार दोघीनींही ७३ हजार २०० रुपयांचे दागिने व रोकड काढून पाकिटात ठेवले.
पिशवीला गाठ मारून देण्याच्या बहाण्याने भामट्याने शोभा यांच्याकडील पिशवी घेत पुन्हा दिली. त्यानंतर दोघींनाही तेथेच थांबण्यास सांगून अनुदानाचे काम करून परत येतो असे भामट्यांनी सांगितले. ते परत न आल्याने शोभा यांनी पिशवीत दागिन्यांची पाहणी केली असता ते मिळून आले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शोभा यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.