पुणे

सांगवीत ‘गँग वॉर’: गोळ्या झाडून खून, नंतर बनविले ’रील’

Laxman Dhenge

पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तरुणावर गोळ्या झाडून निर्घृण खून केला. बुधवारी (दि. 29) रात्री भर वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्याने सांगवी परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, 'गँग वॉर'मधून खून झाल्याचे बोलले
जात आहे. दीपक दत्तात्रय कदम (रा. जयमालानगर, जुनी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील बजरंग शिस्तारे (रा. पिंपळे गुरव, मूळगाव जांबूत, ता. शिरूर, पुणे) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमन गिल आणि साथीदारांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपक कदम हा बुधवारी (दि. 29) रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगवी येथील माहेश्वरी चौकात पान खाण्यासाठी आला होता. त्या वेळी अमन गिल आणि त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी दीपक याच्या तोंडावर तीन गोळ्या झाडल्या.

दीपक कदम खून प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि दीपक यांच्यात पंधरा दिवसांपूर्वी वाद झाला होता. तपासाअंती आणखी काही बाबी समोर येतील. सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे.

– महेश बनसोडे, पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे

टपका रे टपका… एक और टपका

आरोपी अमन गिल याने खून केल्यानंतर एक रील बनवली. 'महानता' चित्रपटातील टपका रे टपका.. एक और टपका.., या गाण्यावर काही फोटो ठेवून ही रिल्स बनवण्यात आली होती. अमन याने ही 'रील' एका मित्रालादेखील पाठवली होती. पोलिसही संबंधित रिल्स पाहून अवाक् झाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT