वेल्हे: जलसंपदा विभागाच्या संपादित जमिनीवर असलेली पानशेत, वरसगाव धरणग्रस्तांची घरे अधिकृत करावीत आणि ही जागा ग्रामविकास विभागाकडे वर्ग करावी, अशी मागणी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केली.
याबाबत बुधवारी (दि. 13) मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त शेतकरी तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. (Latest Pune News)
या बैठकीत माजी आमदार थोपटे यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी तत्काळ कारवाईचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना दिले. जलसंपदा विभागाच्या संपादित जमिनींची तसेच त्यावर असलेल्या धरणग्रस्तांच्या घरांची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
या बैठकीत वांगणी, वाजेघर आणि शिवगंगा खोरे भागातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही विखे यांनी संबंधितांना दिल्या. या पाणी योजनांसाठी सुधारित अंदाजपत्रक सादर करून 15 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले. याशिवाय, गुंजवणी धरण पुनर्वसनासाठी पुरंदर येथे जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही थोपटे यांनी विखे पाटील यांच्याकडे केली.
या बैठकीला पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, नाना राऊत, भाजपा राजगड तालुका अध्यक्ष राजू रेणुसे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, अमोल पडवळ, रमेश मरगळे, राजू कडू, तानाजी चोरगे, संदीप नगिने, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.