India Airstrike Operation Sindoor
पुणे: भारताने जो हल्ला केला, तो योग्यच आहे, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला संपूर्णपणे संपवून टाका, अशी प्रतिक्रिया पहेलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांनी बुधवारी (दि.07) व्यक्त केली.
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पीओकेतील नऊ ठिकाणी असलेली दहशतवादी तळे हवाई हल्ला करून उध्वस्त केली. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला. या पार्श्वभूमीवर पहेलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांच्याशी बुधवारी (दि.07) संवाद साधण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. (Latest Pune News)
त्या पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलून शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळे बुधवारचा हा दिवस आमच्यासाठी समाधानाचा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी त्यांचे पती, कौस्तुभ गनबोटे यांना गमावले. या घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची बातमी ऐकून त्यांना दिलासा मिळाला.
तसेच, 'भारताने जे केले ते योग्यच आहे,' असे सांगताना संगीता यांच्या डोळ्यात एक प्रकारची कृतज्ञता आणि कणखरपणा दिसत होता. 'दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच हवा. त्यांना पूर्णपणे संपवून टाकायला हवे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' यांनी उचललेल्या या पावलामुळे आम्हाला खरी श्रद्धांजली मिळाली आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच, 'ऑपरेशन सिंदूर' असे या कारवाईला नाव देऊन भारताने त्यांच्या भावनांचा आदर केला आहे, याबद्दल त्यांनी पंतप्रधान आणि भारतीय लष्कराचे आभार मानले.