पुणे

पुणे : सणस मैदान अखेर खुले..! 15 दिवस पाच प्रशिक्षकांच्या ताब्यात देणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅथलिट्सना सरावासाठी शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले कै. बाबुराव सणस मैदान खेळाडूंसाठी खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हे मैदान पाच प्रशिक्षकांना पंधरा दिवसांसाठी दिले जाणार असून, त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. महापालिकेच्या बाबुराव सणस मैदान गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते.

नवीन सिंथेटिक ट्रॅक बसवून झाल्यानंतर खेळाडूंना हे मैदान उपलब्ध होईल, अशी आशा खेळाडूंना होती. मात्र, उद्घाटनासाठी मान्यवरांच्या तारखा मिळत नसल्याने मैदान खुले केले जात नसल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर मे महिन्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते मैदानाचे आणि नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतरही मैदान खुले केले जात नसल्याने खेळाडूंमधून नाराजी व्यक्त होत होती. अखेर प्रशासनाने हे मैदान पंधरा दिवस विनाशुल्क पाच प्रशिक्षकांच्या ताब्यात देऊन खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत मैदानाचे काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशिक्षकांवर देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मैदान ठेकेदाराच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.

भाजप पदाधिकार्‍यांचे फोटो व्हायरल

बंद असलेल्या सणस मैदानाचे गेट भरपावसात भाजपचे कसबा पेठेतील पदाधिकारी घोषणाबाजी करत उघडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या फोटो व व्हिडीओमध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना पाटील, माजी नगरसेवक अजय खेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने भाजपच्या दबावाखाली पंधरा दिवस मैदान प्रशिक्षकांच्या ताब्यात दिल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT