‘काळम्मावाडी’चे पाणी लवकरच जॅकवेलमध्ये | पुढारी

‘काळम्मावाडी’चे पाणी लवकरच जॅकवेलमध्ये

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरणातील पाणी लवकरच थेट पाईपलाईनसाठी असलेल्या जॅकवेलमध्ये येणार आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. कॉपर डॅमच्या काठोकाठ पाणी आले असून कोणत्याही क्षणी ते इंटेकवेलमध्ये येईल. त्यानंतर इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व 2 मध्ये आल्यानंतर ते पाणी जॅकवेलमध्ये पोहोचेल.

दरम्यान, कोल्हापूरवासीयांसाठी जिव्हाळ्याची असलेली तब्बल 488 कोटींची थेट पाईपलाईन योजना अंतिम टप्प्यात आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रातील तब्बल दीडशे फूट उंचीचा कॉपर डॅम फोडला आहे. जॅकवेलपासून 300 मीटर लांब काळम्मावाडी धरण क्षेत्रात कॉपर डॅम बांधण्यात आला आहे. योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असून पंपहाऊसह इतर कामे शिल्लक आहेत.

थेट पाईपलाईन योजनेचा काळम्मावाडी धरण क्षेत्रात इंटेकवेल हा पहिला भाग आहे. इंटेकवेल 30 फूट खोल असून त्याचा व्यास साडेचार मीटर इतका आहे. जॅकवेलपासून 240 मीटर लांब इंटेकवेल आहे. धरणातील पाणी या इंटेकवेलमध्ये जमा होणार आहे. धरणातील पाणी इंटेकवेलमध्ये जमा झाल्यानंतर ग्रॅव्हिटीने ते इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व इन्स्पेक्शन वेल क्र. 2 मधून जॅकवेलमध्ये जाणार आहे. इंटेकवेल ते इन्स्पेक्शन वेल क्र. 1 हे अंतर 70 मीटर तर इन्स्पेक्शन वेल क्र. 1 ते इन्स्पेक्शन वेल क्र. 2 चे अंतर 70 मीटर आहे. इन्स्पेक्शन वेल क्र. 2 पासून जॅकवेल क्र. 1 जॅकवेल क्र. 2 कडे 100 मीटर पाईपलाईन टाकून जोडण्यात आली आहे.

योजनेसाठी धरण क्षेत्रात स्वतंत्र अशी जुळे जॅकवेल बांधण्यात आली आहेत. त्याची खोली तब्बल 150 आहे. दोन्ही जॅकवेलचा व्यास प्रत्येकी 18 मीटर इतका आहे. या महाकाय दोन्ही जॅकवेलमध्ये धरणातील पाणी इंटेकवेल, इन्स्पेक्शन वेलद्वारे येणार आहे. या टाक्यामध्ये धरणातील पाण्याचा साठा होणार आहे. या टाक्यातील पाणी उपसा करून ते कोल्हापूर शहराला पुरविण्यात येणार आहे.

Back to top button