पुणे : तब्बल 50 वर्षांपूर्वी सामना चित्रपट प्रदर्शित झाला... विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून अवतरलेली कथा, रामदास फुटाणे यांनी चित्रपट उभा करण्यासाठी केलेला संघर्ष, डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटाचे केलेले दिग्दर्शन, डॉ. श्रीराम लागू अन् निळू फुले यांनी केलेल्या जबरदस्त भूमिका, बर्लिन चित्रपट महोत्सवात चित्रपटाला मिळालेली दाद... असा सामना चित्रपटाचा प्रवास, सामना घडविणाऱ्यांनीच सोमवारी (दि. 24) उलगडला. निर्माते रामदास फुटाणे आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे दीर्घ काळानंतर एकाच व्यासपीठावर आले अन् दोघांनीही किस्से, गप्पांमधून चित्रपटाविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
या वेळी स्क्रीनवर दाखविण्यात येणारे चित्रपटातील दृश्याने तर जणू प्रेक्षकांना सामना चित्रपट आपण पाहत असल्याची प्रचिती दिली अन् हे निमित्त प्रेक्षकांसाठी खास ठरले. रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कवी-वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत रंगली. अमृता मोरे यांनी दोघांशीही संवाद साधला. या मुलाखतीत सामना चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे यांनी चित्रपटाच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास बोलका केला. तर चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा पट उलगडला. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली कथा, डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले या दिग्गजांच्या अभिनयाने साकार झालेल्या या चित्रपटाचा पूर्ण प्रवास मुलाखतीतून प्रेक्षकांना जाणून घेता आला.
चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडताना रामदास फुटाणे म्हणाले, मुंबईत मी खूप चित्रपट पाहिले. आपल्याला चित्रपट क्षेत्रातच काम करायचे आहे या विचाराने मी नोकरी सोडली आणि चित्रपटांकडे वळलो. विजय तेंडुलकर यांनी सुरुवातीला चित्रपटाची कथा लिहिण्यास नकार दिला होता. पण, नंतर त्यांनी होकार दिला. चित्रपटातून सत्तेला प्रश्न विचारणारा माणूस त्यांनी उभा केला. डॉ. जब्बार पटेल यांचे काम मी पाहिले होते. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबाबत मी त्यांना विचारणा केली आणि त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. महिला वर्गाची पसंती मिळविणारे, विनोदी अशा शैलीतील चित्रपट तेव्हा प्रदर्शित होत. मात्र, आपल्या भोवताली जे जळते आहे, त्यावर काही केले पाहिजे. या भावनेतून‘सामना’ची निर्मिती झाली. सुरुवातीला चित्रपट चालला नाही. पण, नंतर तो गाजला.
सामना चित्रपटाचा प्रवास मांडताना डॉ. पटेल यांनी अनेक किस्से सांगितले. डॉ. पटेल म्हणाले, रामदास यांनी मला सामनाबद्दल विचारले. त्यावेळी मला चित्रपटांपेक्षा नाटकांविषयी अधिक माहिती होती. चित्रपट करताना तंत्र नावाची गोष्ट महत्त्वाची असते. तांत्रिक गोष्टीचे भान असावे लागते. मी ते तंत्र शिकलो.
चित्रपटाच्या संवादात प्रचंड ताकद आणि सामर्थ्य होते, ते नाटक वाटू नये हे मनात ठेवले, याला महत्त्व देत चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्याकाळी परदेशातील चित्रपट महोत्सवात भारताकडून कमी चित्रपट पाठवले जायचे. नर्गिस यांनी चित्रपट पाहिला आणि त्यांना तो आवडला. त्यानंतर तो बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी पाठविण्यात आला. हा चित्रपट म्हणजे विजय तेंडुलकर यांची किमया आहे. भाषेच्या पलीकडे जाऊन भष्टाचाराची अवस्था त्याद्वारे मांडण्यात आली.
रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात रामदास फुटाणे आणि डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत रंगली.