Bridge Pudhari
पुणे

Pune Sadhu Vaswani Bridge Delay: साधू वासवानी पूल रखडला; महापालिका-वाहतूक पोलिस आमने-सामने

परवानगीत विलंबाचा आरोप; कोरेगाव पार्कमध्ये वाहतूक कोंडी वाढली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील साधू वासवानी पुलाच्या कामातील विलंबावरून महापालिका आणि पोलिस प्रशासन समोरासमोर आले आहे. वाहतूक पोलिसांकडून या कामासाठी आवश्यक परवानगी तब्बल दीड वर्षे प्रलंबित ठेवल्यामुळेच कामाला विलंब झाल्याचा दावा महापालिकेने केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कोरेगाव पार्क आणि लष्कर परिसराला जोडणारा सुमारे 50 वर्षे जुना साधू वासवानी पूल धोकादायक ठरत असल्याने तो पाडून नवा पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. भूमिपूजनानंतर विविध विभागांच्या परवानग्यांमुळे काम काही काळ रखडले. सध्या पुलाचे काम सुरू असून, या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.

त्यामुळे वाहनचालकांना मोठा वळसा घ्यावा लागत असून, परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव झाली आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. यानंतर दोन्ही प्रशासनांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

...ही आहेत पुलाच्या कामाच्या विलंबाची कारणे

महापालिकेच्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या परवानग्यांनुसार पुलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर मुख्य जलवाहिनी भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, वाहतूक पोलिसांकडून सुमारे दीड वर्षे परवानगी देण्यास झालेल्या विलंबामुळे कामाचा वेग मंदावला. याशिवाय काही तांत्रिक अडचणींमुळेही कामात उशीर झाला.

रेल्वे प्रशासनाकडून परवानग्या मिळाल्या असल्या, तरी उड्डाणपुलाचे काम करताना त्यांच्या वेळापत्रकानुसारच काम करावे लागत आहे. त्यामुळे कामाची गती ठरवताना रेल्वे प्रशासनाशी समन्वय आवश्यक ठरत आहे. या सर्व प्रक्रियेमुळे कामात विलंब झाला असला तरी महापालिकेकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.

वाहतूक पोलिसांकडून या कामासाठी दीड वर्षे परवानगी देण्यात आली नव्हती. जुलै 2025 मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. काम सुरू होऊन अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. हे काम रेल्वे प्रशासनाच्या वेळापत्रकानुसार सुरू आहे. या कामात विलंब झालेला नसून, ते वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT