पुणे : ‘साधना ट्रस्ट’च्या वतीने नवीन वर्षापासून ‘ग. प्र. प्रधान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले आहे. हे केंद्र स्वतंत्र संस्था नसून, ‘साधना ट्रस्ट’च्या अंतर्गत एक विभाग असेल. या केंद्रामार्फत विविध अभ्यासवृत्ती देण्यात येणार असून, वेगवेगळ्या विषयांवरील कार्याशाळा आयोजित करून त्या विषयाबद्दल माहिती दिली जाणार आहे.
‘ग. प्र. प्रधान यांची ओळख एका बाजूला फर्ग्युसन कॉलेजमधील इंग््राजीचे प्राध्यापक, 18 वर्षे विधानपरिषदेचे सदस्य आणि दोन वर्षे विरोधी पक्षनेते अशी राहिली. तर, दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, मराठी व इंग््राजीत लेखन करणारे साहित्यिक आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, अशी प्रधान यांची ओळख होती. त्यांच्या नावाने सुरू केलेल्या या केंद्राचे अध्यक्ष म्हणून रसायनशास्त्रज्ञ सुरेश गोरे,
तर निमंत्रक म्हणून ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ काम पाहणार आहेत. या केंद्रांतर्गत असलेल्या संशोधन केंद्राद्वारे एक ते सहा महिन्यांच्या अभ्यासवृत्ती देण्यात येणार आहे, तर काही अभ्यासवृत्ती एक लाख रुपयांच्या असतील, याचा कालावधी सहा महिने ते एक वर्ष असेल. या अभ्यासवृत्तीतून आलेले लेखन ‘साधना’मार्फत प्रकाशित केले जाणार आहे. प्रशिक्षण कार्यशाळेसाठी अर्ज मागवणार असल्याचे विनोद शिरसाठ यांनी सांगितले.
‘महाराष्ट्रातील दहा कुलगुरूंच्या मुलाखती’ या अभ्यासवृत्तीसाठी सुनील पाटील (छत्रपती संभाजीनगर) यांना तसेच चीनमध्ये ट्रान्सलेशन स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली सानिया कर्णिक हिला रवींद्रनाथ टागोर यांनी 100 वर्षांपूर्वी केलेल्या चीन दौऱ्यातील पाच भाषणांचे अनुवाद करण्यासाठी अभ्यासवृत्ती देण्यात आली आहे. ‘अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा’ या विषयावर 23 ते 25 जानेवारीदरम्यान कार्यशाळा होणार आहे.
नीरज हातेकर, अभय टिळक व मानसी फडके ही कार्यशाळा घेणार आहेत. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित होतो’ या विषयावर 26 ते 28 फेबुवारीदरम्यान कार्यशाळा होणार आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेर अनुक्रमे ‘अनुवाद’ आणि ‘मुलाखत’ या कार्यशाळा होतील. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ‘भारतातील प्रादेशिक पक्ष’ आणि ‘भारताचे शेजारी’ या विषयांवर कार्यशाळा होतील, असेही विनोद शिरसाठ यांनी नमूद केले.