खोर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमधील कमी होत चाललेला यशाचा दर ही आजची गंभीर आणि चिंताजनक बाब बनली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांत परंपरेने स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवले होते; मात्र अलीकडच्या काळात या यशाच्या आकड्यांमध्ये लक्षणीय घसरण दिसून येत आहे. बदलते शैक्षणिक वातावरण, तांत्रिक साधनांचा अभाव, योग्य मार्गदर्शनाची कमी आणि आर्थिक अडचणी ही या घसरणीची प्रमुख कारणे समोर येत आहेत.
ग्रामीण भागात आजही अनेक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची साधने उपलब्ध नाहीत. ऑनलाइन वर्ग, डिजिटल नोट्स, व्हिडीओ लेक्चर्स यांसारखी साधने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात असताना ग्रामीण विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळणे कठीण ठरत आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले सद्य घडामोडींचे ज्ञान व अद्ययावत सामग्री ग्रामीण भागात वेळेवर पोहचत नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींशी मागे पडतो. याशिवाय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची कमतरता देखील मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. शहरांमध्ये मोठी कोचिंग संस्था, अनुभवी मार्गदर्शक आणि उत्कृष्ट अभ्याससामग्री उपलब्ध असते. परंतु, ग्रामीण विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते. यात वाहतूक खर्च, राहण्याची सोय, शुल्क या सर्वांमुळे आर्थिक भार वाढतो.
अनेक हुशार विद्यार्थी या अडचणींमुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीपासून दूर राहतात. पालकांचे शिक्षण कमी असणे, विद्यार्थ्यांवर लवकर रोजगार मिळवण्याचा दबाव, शेती कामामुळे अभ्यासात खंड पडणे ही देखील महत्त्वाची कारणे मानली जातात. काही भागात करिअर मार्गदर्शनाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्या परीक्षेची तयारी कशी करायची आणि त्यासाठी काय आवश्यक आहे, याची अचूक माहिती मिळत नसल्याचे देखील या घसरणीमागे कारण आहे.
शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार आवश्यक
ग्रामीण भागातील घसरती कामगिरी थोपवण्यासाठी शासनाने तसेच सामाजिक संस्था, स्वयंसेवी गटांनी पुढे येण्याची गरज आहे. गावागावांत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, डिजिटल लॅब, वाचनालये, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळू शकतो. तसेच गावातील निवृत्त शिक्षक, अधिकारी, तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याची चळवळ उभी राहणेही अत्यावश्यक आहे.