

नारायणगाव: कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने पाण्याची गळती थांबणार आहे. येडगाव धरणापासून 60 किलोमीटर अंतरापर्यंत या कालव्याची दुरुस्ती करण्यात येणार असून, यासाठी जलसंपदा विभागाने 82 कोटी रुपये मंजूर केले असून, यामध्ये अस्तरीकरण, कालवा दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.
नान्नारे म्हणाले, येडगाव धरणापासून कालवा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. येडगाव धरणाजवळ कालवा अधिक खराब झाला असून, जलसेतूमधून पाण्याची मोठी गळती होत आहे. या दुरुस्तीमुळे पाण्याची पूर्ण गळती थांबणार आहे. ज्या ठिकाणी कालवा खराब झाला आहे आणि त्यावरील छोटा पूल बांधकाम करावा लागणार आहे.
हे काम देखील यामध्येच पूर्ण होणार आहे. येडगाव धरणापासून पुढे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडनेर गावापर्यंत ज्या ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण निघाले आहे अथवा ज्या ठिकाणचे बांधकाम खराब झाले आहे ही सर्व डागडुजी केली जाणार आहे. काही ठिकाणी भरावा देखील टाकावा लागणार आहे. तेथे भरावा टाकण्याचे देखील काम केले जाणार आहे. या कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करण्यात आल्याचे नान्नोर यांनी सांगितले.
येडगाव धरणाचे काम 1972 मध्ये सुरू केले होते व पाच वर्षात 1977 ला धरण पूर्ण झाले. कुकडी डावा कालवा 250 किलोमीटर अंतराचा आहे. हा कालवा ज्या ठिकाणी खराब झालेला आहे. त्याची टप्प्याटप्प्यानी दुरूस्ती केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी सांगितले. सध्या पहिल्या टप्प्यात हे काम सुरू झाले असून, 60 किलोमीटर अंतरापर्यंत खराब झालेला कालवा दुरुस्त केला जाणार आहे व यासाठी जलसंपदा विभागाने 82 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
धरणामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला बहुतांशी लोकांना मिळाला. अनेक शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या, परंतु, काही लोकांचा मात्र अद्यापही पुनर्वसनाचा विषय मार्गी लागलेला नाही.
बाबाजी नेहरकर, सामाजिक कार्यकर्ते
कुकडी डावा कालवा दुरुस्तीचे काम कोल्हापूर येथील श्रीनिवास कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले असून, या कामाची मुदत दोन वर्षाची असणार आहे. या कंपनीचे सिमेंट मिक्स करण्याचे युनिट व त्यांची संपूर्ण यंत्रणा, लेबर व मशिनरी येडगाव धरणाच्या जवळ मोकळ्या जागेत राहणार आहे. या जागेचे भाडे शासनाच्या नियमाप्रमाणे वसूल करण्यात येईल.
गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता