

सासवड: सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर मंगळवारी (दि. 2) झालेल्या निवडणुकीत 67.02 टक्के मतदान झाले. मतदानानंतर ईव्हीएम मशिन सासवड नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्राँग रूमला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले.
सासवड नगरपालिकेत शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये स्ट्रॉंग रूम बनवली आहे. मतदान झाल्यापासून ते 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होईपर्यंत मतदान यंत्रे पूर्णपणे सुरक्षित राहावीत, यासाठी अहोरात्र बंदोबस्त येथे राहणार आहे. नगरपालिकेत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. इमारतीच्या एका रूममध्ये ही मतदान यंत्रे सुरक्षित ठेवली आहेत. स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेसाठी निमलष्करी दलाच्या 10 जवानांची पलटण तैनात केली आहे. त्यांच्या दिमतीला एक सहायक पोलिस निरीक्षक, तसेच 9 पोलिस जवान आहेत.
स्ट्रॉंग रूममध्ये व भोवती तिहेरी पहारा ठेवण्यात आला आहे. सर्वात आत निमलष्करी दलाची सशस्त्र तुकडी आहे. बाहेरच्या वर्तुळात खास पोलिस, तर स्ट्राँग रूमवर अहोरात्र नजर ठेवण्यास 30 कॅमेरे बसविले आहेत. याबरोबरच मतदान यंत्रे सुरक्षित राहावीत, यासाठी आगीसारखा धोका लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. स्ट्राँग रूमलगतच नियंत्रण कक्ष असून, तो देखील अहोरात्र कार्यरत राहणार आहे.
नगरपालिकेच्या ठिकाणी स्थापन केलेल्या स्ट्राँग रूमला सशस्त्र पोलिसांचे संरक्षण असून मतमोजणी होईपर्यंत येथे 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहणार आहेत. स्ट्राँग रूमच्या इमारतीत निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या इमारतीच्या 20 मीटर परिसरात जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे
झालेले प्रत्यक्ष मतदान
सासवड नगरपालिकेत 33 हजार 656 मतदारांपैकी 22 हजार 557 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 11 हजार 412 पुरुष आणि 11 हजार 145 महिला मतदारांचा समावेश आहे. यंदा मतदानाचा टक्का घसरून 67.02 टक्क्यांवर आला.
सासवड नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कडक पोलिस बंदोबस्त आहे. ओळखपत्र आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी स्ट्राँग रूमजवळ पाहणी करण्यासाठी येऊ शकतात.
डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपालिका