शिवदास शितोळे
परिंचे: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी दररोज बसने किंवा पायी प्रवास करून शाळा आणि महाविद्यालयात जातात. घरापासून बसस्थानक, सार्वजनिक रस्ते आणि महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंतचा प्रवास अनेकदा त्यांच्यासाठी असुरक्षित ठरत असल्याचे वास्तव आहे. टवाळखोरांकडून होणारी छेडछाड, अश्लील टिप्पणी आणि पाठलाग, यामुळे अनेक मुली मानसिक तणावाखाली शिक्षण घेत आहेत.
शिक्षण बंद होण्याच्या भीतीने अनेक मुली घरीही याबाबत बोलत नाहीत; मात्र काही धाडसी विद्यार्थिनी पुढे येऊन तक्रार दाखल करतात आणि कायद्याची मदत घेतात. अशा मुलींच्या पाठीशी केवळ पालकांनीच नव्हे, तर संपूर्ण समाजाने ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.
मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे महत्त्वाचे असले, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी, सातत्यपूर्ण जनजागृती आणि समाजातील सकारात्मक बदल अधिक आवश्यक आहेत. कोणत्याही मुलीची छेडछाड होताना दिसल्यास नागरिकांनी बघ्याची भूमिका न घेता तत्काळ हस्तक्षेप करणे, हीही सामाजिक जबाबदारी आहे.
आवश्यक उपाययोजना
शाळा-महाविद्यालय परिसरात नियमित पोलिस गस्त.
सीसीटीव्ही, पुरेसा प्रकाश आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था.
प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तक्रार निवारण समिती.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी नियमित जनजागृती कार्यक्रम.
स्वसंरक्षण व सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण.
छेडछाडीच्या घटनांवर तातडीची, निष्पक्ष कारवाई.
पालकांनी मुलींशी विश्वासाचे आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. विविध परिस्थितींना धैर्याने सामोरे जाण्याचे आणि स्वतःचे संरक्षण करण्याचे संस्कार घरातूनच झाले, तर अनेक अनुचित घटना टाळता येऊ शकतात.ॲड. वनिता धुमाळ