Ashok Kharat case
पुणे : भोंदूबाबा अशोक खरात याच्या वादग्रस्त प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे.
अशोक खरात याच्याशी संबंधित 'शिवनिका ट्रस्ट'च्या आजी-माजी सदस्यांची आणि ट्रस्टींची चौकशी एसआयटीकडून केली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. या प्रकरणामध्ये नाव आल्यापासून चाकणकर यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
खरात प्रकरण समोर आल्यानंतर रूपाली चाकणकर यांना गेल्या काही दिवसांत दोन मोठे राजकीय धक्के बसले आहेत. प्रथम त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.
कोणत्याही तपासात नाव समोर आल्यास पोलीस त्यांची बाजू पडताळून पाहण्यासाठी समन्स बजावतात. त्यानुसार, चाकणकर यांचा जबाब नोंदवून घेतला जाईल.तपासात जे तथ्य समोर येईल, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.