पुणे : पुढारी वृत्तसेवा
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झालेल्या धक्का बुक्की प्रकरणी ६० ते ७० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. पण, पथके रवाना केल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय 30) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवी कलम 143, 147, 149, 341, 336, 337, 323, 504 तसेच मु. पो. अॅक्ट कलम 37(1) सह 135 नुसार शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह 60 ते 70 महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायर्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते जमले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसर्या पायरीवरून ओढल्याने ते पडले. त्यामुळे त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास विक्रम गौड हे करत आहेत.